ऑस्ट्रेलियाच्या जंगलात वणवा, ५ कोटी प्राण्यांचा मृत्यू

म्हणून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला आहे.   

Updated: Jan 5, 2020, 05:55 PM IST
ऑस्ट्रेलियाच्या जंगलात वणवा, ५ कोटी प्राण्यांचा मृत्यू title=

सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या जंगलात भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये सुमारे ५ कोटींपेक्षा जास्त प्राण्यांनी आपले प्राण गमावले आहे. गेल्यावर्षी ऍमेझॉन जंगलाला लागलेल्या भीषण आगीनंतर ऑस्ट्रेलियातील जंगलात ४ महिन्यांपासून आग धगधगत आहे. देशातील परिस्थिती पाहता ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला आहे. १३ जानेवारीपासून ते ४ दिवस भारत दोऱ्यावर येणार होते. 

पुढील काही महिन्यांमध्ये पुन्हा भारत दौऱ्याची तारीख निश्चित करू असे सांगत स्कॉट मॉरिसन म्हणाले की, 'सध्या देशात आगीचा वणवा भडकला आहे. त्यामुळे आमचं संपूर्ण लक्ष देशातील जनतेच्या सुरक्षेकडे आहे. काहींची आगीतून सुखरूप सुटका करण्यात आली तर काही आजूनही आगीशी झुंज देत आहेत.' सध्या ऑस्ट्रेलियात भीतीचे वातावरण आहे. 

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यात जंगलात लागलेल्या आगीबद्दल चर्चा झाली. या आगीत प्रचंड नुकसान झाल्यामुळे मोदींनी समस्त भारतीयांकडून संवेदना देखील व्यक्त केली. एवढचं नाही तर पंतप्रधान मोदींनी मदतीचा एक हात देखील पुढे केला आहे. 

डिसेंबर महिन्यात लागलेल्या आगीनंतर विक्टोरिया आणि  न्यू साउथ वेल्समध्ये कमीत-कमी २० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच रौद्र रूप धारण केलेल्या या आगीमुळे १ हजार ३०० पेक्षा जास्त घरं नष्ट झाली आहेत. शिवाय आगीमध्ये ५ कोटींपेक्षा जास्त प्राण्यांचा जीव गेला आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्यास आसलेल्या भारतीय रेस्टॉरंटचे मालक विक्टोरिया राज्यातील आगीने प्रभावित असलेल्या लोकांसाठी भोजन पुरवत आहेत. द डेली मेलच्या रिपोर्टनुसार कंवलजीत सिंग आणि त्यांची पत्नी कमलजीत कौर असं त्यांचं नाव आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार २०१७ च्या आधीपासून ऑस्ट्रेलिया दुष्काळाचा सामना करत आहे.