उत्तर कोरीया: उत्तर कोरीयातल्या अणू चाचणी परीक्षेत्रात बोगदा खचून दोनशेहून अधिक जण मृत्यू पावले असल्याची भीती, जपानी वृत्तवाहिनीनं दिली आहे.
उत्तर कोरीयानं 3 सप्टेंबरला सहावी आणि आतापर्यंतची सर्वात मोठी भूमिगत अणू चाचणी घेतली. त्यानंतर काहीच दिवसांत पुनगी-री इथे ही दुर्घटना घडल्याचं जपानी वृत्तसंस्था टीवी असाहीनं, उत्तर कोरीयाच्या निनावी सूत्राच्या हवाल्यानं म्हंटलंय. आधी बोगदा खचून सुमारे शंभर जण अडकले. त्यांच्यासाठी बचावकार्य राबवत असताना, पुन्हा बोगदा खचून, त्यात सुमारे दोनशे जण दगावल्याचं सांगितलं जातंय.
उत्तर कोरीयाच्या अणू चाचणीमुळेच ही दुर्घटना घडली असल्याचा दावा, जपानी वृत्तवाहिनीनं केला आहे. मात्र उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्या पोलादी पडद्यामुळेच दुर्घटना आणि जीवितहानीची ही बातमी दडपण्यात आल्याचा आरोप जपानी वृत्तवाहिनीनं केलाय. दरम्यान अशा प्रकारच्या भूमिगत अणूचाचण्यांमुळे, पर्वतच खचण्याचा तसंच अणूचे किरणोत्सर्ग वातावरणात मिसळले जाण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
उत्तर कोरीयानं 2006 पासून केलेल्या भूमिगत अणू चाचण्यांमुळे हे क्षेत्र तसंच आसपासच्या भागातही भूस्खलनाच्या घटनांत वाढ झाल्याचंही पाहणीत दिसून आलंय.