Father's Day 2023 : आईवडिलांच्या सन्मानांसाठी त्यांच्या प्रती आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी मदर्स आणि फादर्स डे साजरा करण्यात येतो. मे महिन्यात मदर्स डे आपण साजरा केला. आता वडिलांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी जून महिन्यात फादर्स डे साजरा केला जातो. जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. यंदा फादर्स डे 18 जूनला साजरा करण्यात येणार आहे. वडील म्हणजे नारळ...वरुन कठोर दिसणारी ही व्यक्ती आतून खूप हळवी असतात. त्यात आपल्या चिमुकल्यांसाठी तर त्यांचा जीव तुटतो. मुलांसाठी त्यांचे वडील हे सुपरहिरो असतात. मुलासाठी आदर्श व्यक्तिमत्व तर मुलीसाठी श्वास असतो. आपल्या होणारा नवरा हा आपल्या वडिलांसारखा असावा असं प्रत्येक मुलीला वाटतं.
वडील आणि मुलांमधील नातं हे आपुलकीचं तर असतं सोबत जबाबदारी, सुरक्षा आणि काळजीचं असतं. आई 9 महिने बाळाला आपला पोटात वाढवते आणि वडील त्यावेळी त्याची हवी तेवढी काळजी आणि बाळाच्या भविष्यासाठी झटत असतो. आजकाल म्हणतात ना we are pregnant. आईचं प्रेम दिसतं पण बापाची रागत दिसतो, असं आपण म्हणतो. पण मुलांचं संगोपन आणि शिस्त लावण्यासाठी या व्यक्तीला अनेक वेळा कठोर व्हावं लागतं. पण आईच्या प्रेमा एवढंच वडिलांचं प्रेम असतं किंवा त्याहून कधी कधी त्याहून अधिक असतं.
डोळ्यात न दाखवताही जो आभाळा एवढं प्रेम करतो त्याला वडील नावाचा राजा माणूस बोलतात. अशा या व्यक्तीच्या सन्मानचा दिवस पहिल्यांदा कधी साजरा झाला. काय आहे दिवसाचा इतिहास जाणून घेऊयात संपूर्ण माहिती.
काही इतिहासकारानुसार फादर्स डे पहिल्यांदा 1910 मध्ये साजरा करण्यात आला होता. त्यांचा मते वॉशिंग्टनच्या स्पोकेन शहरात पहिल्यादा फादर्स डे साजरा करण्यात आला. जेव्हा एका मुलीने तिच्या वडिलांच्या स्मृतीसाठी एक दिवस समर्पित केला. ही मुलगी वॉशिंग्टनची होती आणि आईपेक्षा जास्त प्रेम वडिलांनी तिला केल्याबद्दल तिने हा दिवस साजरा केला.
सोनोरा लुईस स्मार्ट असं त्या लेकीचं नाव आहे. आईच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी एकट्याने तिचं संगोपन केलं. आईचं प्रेम आणि वडिलांची संरक्षण अशी दुहेरी भूमिका त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे निभावली. वडिलांच्या या प्रेमामुळे सोनोराला तिच्या आईची उणीव कधीच भासली नाही. म्हणून तिने थँक्यू बोलण्यासाठी हा दिवस साजरा केला. (father day 2023 date know history significance and When did Fathers Day start Which girls Sonora Louise Smart first celebrated Fathers Day )
काही इतिहासकरांचं असंही म्हणं आहे की, 5 डिसेंबर 1907 रोजी वेस्ट व्हर्जिनियामध्ये खाण दुर्घटनेत 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या लोकांमध्ये सर्वाधिक लेकांनी त्यांचे वडील गमावले होते. त्यामुळे काही सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे 5 जुलै 1908 हा दिवस त्या वडिलांना श्रद्धांजली म्हणून फादर्स डे साजरा करण्यास सुरुवात केली.
राष्ट्राध्यक्ष केल्विन कूलिज यांनी 1924 मध्ये फादर्स डे हा राष्ट्रीय कार्यक्रम घोषित केला. त्यानंतर 1966 मध्ये राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करण्याचा निर्णय घेतला. मग राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी 1972 मध्ये जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करण्याचं विधेयक मंजूर केलं. एवढंच नाही तर 1972 मध्ये अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी हा दिवस सुट्टी म्हणून घोषित केला होता.
तेव्हापासून जूनच्या तिसऱ्या रविवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. भारत, अमेरिका, कॅनडा, ग्रीस, इंग्लंड, मेक्सिको, आयर्लंड, पाकिस्तान, व्हेनेझुएला आणि अर्जेंटिना देशात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.