भारताच्या 'एअरस्ट्राईक'नं पाकिस्तान हादरलं, 'एमर्जन्सी मीटिंग' बोलावली

पाकिस्तानकडून भारताच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचा दावा केलाय

Updated: Feb 26, 2019, 10:41 AM IST
भारताच्या 'एअरस्ट्राईक'नं पाकिस्तान हादरलं, 'एमर्जन्सी मीटिंग' बोलावली title=

इस्लामाबाद : भारतीय वायुसेनेनं मंगळवारी पहाटे पाक अधिकृत काश्मीरमध्ये हवाई हल्ला करत दहशतवादी संघटना 'जैश ए मोहम्मद'च्या अनेक ठिकाणींना लक्ष केलं. 'मिराज २०००' या सुपरसॉनिक विमानांतून जवळपास १००० किलो स्फोटकांचा मारा या ठिकाणांवर करण्यात आला, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय. पाकिस्तानकडून भारताच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचा दावा केलाय. परंतु, यानंतर मात्र पाकिस्तानात तत्काळ एमर्जन्सी मीटिंग बोलावण्यात आलीय. 

पाकिस्तानचे परदेश मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी तत्काळ परदेश कार्यालयात एक आपात्कालीन सल्लामसलत बैठक बोलावलीय. या बैठकीत माजी परदेश सचिव आणि वरिष्ठ राजकीय नेते भाग घेणार आहेत. सध्याच्या परिस्थितीवर विचार-विनिमय करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आलीय. पाकिस्तानी वृत्तसंस्था 'डॉन'नं ही माहिती दिलीय. 

सूत्रांच्या माहितीनुसार, भारताकडून पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये बालाकोट, चकोटी आणि मुजफ्फराबादमध्ये सकाळी ३.३० वाजता ही कारवाई केली. या हल्ल्यात बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मदचा कंट्रोल रुम उद्ध्वस्त करण्यात आलाय. जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर १२ दिवसांनी पाकिस्तानला हा झटका दिला आहे. पुलवामातील अवंतीपोरामध्ये करण्यात आलेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.