भारत-चीन सीमेवरील परिस्थिती खूपच धोकादायक- डोनाल्ड ट्रम्प

अमेरिका दोन्ही देशांचा आदर करत मदत करण्यास तयार आहे. आमच्या हातात तेवढेच आहे. 

Updated: Sep 5, 2020, 07:53 AM IST
भारत-चीन सीमेवरील परिस्थिती खूपच धोकादायक- डोनाल्ड ट्रम्प title=

वॉशिंग्टन: भारत-चीन सीमेवरील परिस्थिती सध्या खूपच धोकादायक झाली आहे. चीन अनाकलनीय अशा आक्रमक पद्धतीने वागत आहे, असे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकारपरिषेदत बोलत होते. यावेळी त्यांना भारत-चीन यांच्यातील तणावाच्या परिस्थितीसंदर्भात भाष्य केले. चीन भारतावर मुजोरी करत आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मला तसे वाटत नाही. पण अनेकांच्यादृष्टीने ते निश्चितच अनाकलनीय अशा आक्रमकपणे वागत आहेत. त्यामुळे सध्या भारत-चीन सीमारेषेवरील परिस्थिती धोकादायक झाली आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले. 

मात्र, अमेरिका दोन्ही देशांचा आदर करत मदत करण्यास तयार आहे. आमच्या हातात तेवढेच आहे. यासाठी अमेरिका दोन्ही राष्ट्रांशी चर्चा करेल. मात्र, सध्याच्या घडीला जगात चीनची रशियापेक्षाही जास्त चर्चा आहे. कारण, चीन रशियापेक्षाही वाईट वागत आहे. चायना व्हायरसमुळे (कोरोना) काय झाले, त्याकडे पाहा. या सगळ्यामुळे जगातील १८८ देशांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घ्या, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचविले. 

दरम्यान, या पत्रकारपरिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र आहेत. ते खूपच चांगले काम करत आहेत. आमच्या रिपब्लिकन पक्षाला भारतीयांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत अमेरिकेतील भारतीय लोक आम्हाला मतदान करतील, असे वाटते. कोरोनाची साथ येण्यापूर्वीच मी भारतात गेलो होतो. तेथील लोक खूप अद्भुत आहेत. भारताला महान नेता आणि महान जनता लाभल्याचेही यावेळी ट्रम्प यांनी सांगितले.