न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर लागलं 'ट्रम्प डेथ क्लॉक'

अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांसोबत 'ट्रम्प डेथ क्लॉक'ची चर्चा सुरू आहे.

Updated: May 13, 2020, 10:15 PM IST
न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर लागलं 'ट्रम्प डेथ क्लॉक' title=

न्यूयॉर्क : अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांसोबत 'ट्रम्प डेथ क्लॉक'ची चर्चा सुरू आहे. न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर ट्रम्प डेथ क्लॉक लिहिलेला डिजीटल बिलबोर्ड लावण्यात आला आहे. या बिलबोर्डवर सरकारी निष्काळजीपणामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या लावण्यात आली आहे. चित्रपट निर्माते यूजीन जेर्की यांनी हे ट्रम्प डेथ क्लॉक डिझाईन केलं आहे. कोरोनामुळे खाली झालेल्या टाईम्स स्क्वेअर बिल्डिंगच्या सगळ्यात उंच ठिकाणी हा बिलबोर्ड लावण्यात आला आहे.

ट्रम्प यांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतले असते, तर अनेकांचे जीव वाचले असते, असं यूजीन जेर्की म्हणाले आहेत. ट्रम्प डेथ क्लॉकनुसार सोमवारपर्यंत ४८ हजारांपेक्षा जास्त जणांचा सरकारच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. अमेरिकेमध्ये कोरोनामुळे ८० हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांनी वेळेत उपाययोजना केल्या असत्या तर यापेक्षा अर्ध्या जणांचा मृत्यू झाला असता, असा दावा जेर्की यांनी केला आहे. 

१६ मार्चऐवजी ९ मार्चलाच ट्रम्प यांनी सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य केलं असतं आणि शाळा बंद केल्या असत्या तर ६० टक्के मृत्यू रोखता आले असते, असं जेर्की म्हणाले. अमेरिकेतले संसर्गजन्य रोगातील तज्ज्ञ एंथनी फौसी यांच्या संशोधनाचा दाखला यूजीन जेर्की यांनी दिला आहे. चित्रपट निर्माते यूजीन जेर्की यांनी २ वेळा सनडान्स फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार पटकावला आहे.