Pregnancy Scandal: डेन्मार्क आणि ग्रीनलँडमध्ये (Denmark - Greenland) असणाऱ्या इनुइत समूहातील महिला आणि तरुणींबाबतची (Women Teenage girls) धक्कादायक बाब जगासमोर आली आहे. लोकसंख्या नियंत्रणाच्या नावाखाली या महिलांची इतकी फसवणूक करण्यात आली आहे, की ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. आजही त्या महिला गतकाळात त्यांच्यासोबत घडलेल्या घटनांचा विचार करतात तेव्हा त्यांचं मन विषण्ण होतं. 1960-70 च्या दशकापासून अनेक वर्षे महिला आणि तरुणींच्या गर्भाशयात एस अशी गोष्ट सोडली जात होती ज्यामुळं त्यांच्या प्रजनन क्षमतेवर त्याचे थेट परिणाम होत होते. महिलांची गर्धारणा रोखण्यासाठी हे सर्व केलं जात होतं. सध्या ग्रीनलँड आणि डेन्मार्कमध्ये या प्रकरणी जवळपास दोन वर्षांसाठीच्या तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. तिथे सदर प्रकरणी तपासाचे आदेश दिले असतानाच आता संपूर्ण जगासमोर त्या महिलांच्या वेदना आणि त्या सामोऱ्या गेलेल्या परिस्थितीवरून पडदा उठत आहे. (Denmark Birth Control Scandal Inuit Women IUD )
BBC च्या वृत्तानुसार ज्या महिलांच्या गर्भाशयात (uterus) आययूडी लावण्यात आलं होतं त्यांच्यापैकीच एका महिलेनं तिच्यासोबत नेमकं काय घडलं होतं यावरून पडदा उचलला. तिचा प्रत्येक शब्द जसजसा कानांवर पडू लागला तसतसं ऐकणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागली.
नेमकं काय घडलं होतं?
1970 मध्ये नाझा एल. (नावाबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे.) नामक महिलेला दैनंदिन शालेय तपासणीसाठी स्थानिक रुग्णालयात न्यावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यावेळी त्यांचं वय अवघी 13 वर्षे इतकं होतं. तपासणीच्या बहाण्यानं त्यांच्या गर्भाशयाच हे डिवाईस लावण्यात आलं होतं. आता त्यांचं वय 60 वर्षे इतकं आहे.
'मला माहित नव्हतं की ते काय आहे, त्याबाबत मला काहीच सांगण्यातही आलं नव्हतं. परवानगी तर घेतलीच नव्हती', असं सांगताना आपल्या मनात इतकी भीती होती की याविषयी आईवडिलांनाही काहीच सांगितलं नव्हतं, असं या साऱ्याला सामोरं गेलेल्या नाझा म्हणाल्या.
मी फार घाबरलेले...
आपल्यासोबत घडलेल्या त्या भयावह प्रसंगाविषयी सांगताना नाझा म्हणाल्या, 'मी त्यावेळी फार घाबरलेले होते. मला आठवतंय की तिथं सफेद कोट घालून डॉक्टर्स (Doctors) आणि नर्सही होत्या. मी प्रचंड घाबरलेले. त्यावेळी डॉक्टरांनी जे उपकरण वापरलं ते लहान मुलीच्या शरीरासाठी फारच मोठं होतं. मला असं वाटलं की कोणी धारदार वस्तू माझ्या शरीरात टाकत आहे'.
हे प्रकरण ऐकल्यानंतर अनेकांचाच थरकाप उडाला. यासाठी कोणत्याही विद्यार्थ्याच्या पालकांची परवानगी घेण्यात आली नव्हती. इतकंच नाही, तर त्यांच्यासोबत त्यावेळी शाळेत शिकणाऱ्या इतरही मुलींना रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं. पण, याविषयी कोणीही चकार शब्द काढला नव्हता.
हल्लीच एका पॉ़डकास्टमधून समोर आलेल्या माहितीनुसार स्पाइरलकॅम्पेनच्या अहवालात ग्रीनलँडमध्ये 60-70 च्या दशकात जवळपास 4500 महिला- तरुणींमध्ये IUD लावण्यात आल्याची माहिती मिळाली. यामध्ये अद्यापही कितीजणींची परवानगी घेण्यात आली होती तो आकडा मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकलेला नाही.