Two Powerful Storms Collide: अमेरिकेच्या अग्नेय समुद्रकिनारपट्टीला एकाचवेळी 2 वादळांनी धडक दिली आहे. या विचित्र परिस्थितीमुळे चिंता वाढली असून या क्षेत्रातील तज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे. एकीकडे इडालिया (Hurricane Idalia) वादळ फ्लोरिडाच्या समुद्रकिनाऱ्याकडे वाटचाल करत असताना दुसरीकडे फ्रँकलिन वादळ (Hurricane Franklin) बर्म्युडाजवळ घोंगावत आहे. या दोन्ही वादळांमधील अंतर दिवसोंदिवस कमी होत असून ही चिंतेची बाब आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ही दोन्ही वादळं एकमेकांना प्रत्यक्षात धडकण्याची शक्यता फारच कमी आहे. मात्र असं असलं तरी एकाचवेळी दोन्ही वादळांचा तडाखा बसल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. ही दोन्ही वादळं एकमेकांना धडक देणार नाही ही शक्यता कमी असली तरी पूर्णपणे फेटाळता येणार नाही अशी आहे. ही दोन्ही वादळं एकमेकांना धडकली तर काय होईल?
जेव्हा 2 चक्रीवादळं एकाच दिशेने फिरत एकमेकांजवळ येतात तेव्हा ही दोन्ही वादळं एकाच केंद्राच्या आजूबाजूला वेगाने फिरु लागतात. ज्या ठिकाणी ही वादळं प्रत्यक्षात एकमेकांना धडकतात तिथे फुजिवारा इफेक्ट दिसून येतो. फुजिवारा इफेक्ट निर्माण होण्यासाठी 2 वादळांची केंद्रं एकमेकांपासून 1400 किमीपेक्षा कमी अंतरावर असणं गरजेचं असतं. जपानमधील हवामान तज्ज्ञ सकुहेई फुजिवारा (Sakuhei Fujiwhara) यांनी या प्रभावासंदर्भातील संशोधन केलं असल्याने त्यांच्या नावावरुन हे नाव ठेवण्यात आलं आहे. पहिल्यांदा 1921 साली प्रकाशित झालेल्या एका संशोधनामध्ये त्यांनी या प्रभावाबद्दल विधान केलं होतं. अनेक वर्षानंतर ही घटना पश्चिम पॅसिफिक महासागरामध्ये दिसून आली होती. 1964 साली मॅरी आणि कैथी वादळं एकमेकांना धडकली होती.
फुजिवारा इफेक्टमध्ये अशी शक्यता असते की धडक देणाऱ्या वादळांपैकी एक वादळ दुसऱ्यापेक्षा अधिक प्रभावी असले तर छोट्या आकाराचं वादळ मोठ्या वादळात लुप्त होतं. दुसरी शक्यता अशी असते की 2 समान ताकदीची वादळं धडकली किंवा एकमेकांच्या जवळून गेली तर ती एका समान केंद्राभोवती फिरु लागतात आणि एकमेकांमध्ये विलीन होतात. याच परिस्थितीमधील दुसरी शक्यता अशी की दोन्ही वादळं काही काळ एकमेकांभोवती फिरतात आणि नंतर आपआपल्या मार्गेने मार्गस्थ होतात. तिसऱ्या शक्यतेनुसार जेव्हा 2 शक्तीशाली वादळं एकत्र येतात तेव्हा त्यामधून सुपरसायक्लॉनचा म्हणजेच मोठ्या आकाराच्या वादळाचा जन्म होतो. मात्र ही शक्यता फारच कमी असते. पण असं झालं तर होणारं नुकसान हे अधिक असतं. चौथी शक्यता अशी असते की, छोटं वादळ पूर्णपणे नष्ट होतं. पाचव्या शक्यतेनुसार छोटं वादळ वातावरणामध्ये अचानक नाहीसं होऊन जातं.
28 ऑगस्टपासून इडालिया वादळ उत्तरेकडून वाहत आहे. त्यामुळे मॅक्सिकोची खाडी ओलांडून फ्लोरिडाच्या पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. क्यूबाजवळ त्याचा वेग 112 किलोमीटर प्रति तास इतका असेल. दुसरीकडे फ्रँकलिन वादळ पूर्वेकडून अटलांटिक महासागरावर तयार झालं आहे. फ्रँकलिन वादळामुळे बर्म्युडामध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. ही 2 वादळं धडकण्याची शक्यता कमी असली तरी पूर्णपणे नाकारण्यासारखी नाही.