मुंबई : कोरोना (Coronavirus) म्हणजे कोविड-१९ ((Covid-19) या व्हायरसने जगात पदार्पण करुन आज बरोबर एक वर्ष पूर्ण झाले आहे. मागच्या वर्षी आजच्याच दिवशी चीनमध्ये कोरोना रुग्ण सापडला. आणि वर्षभरात त्यानं संपूर्ण जग व्यापले. सध्या कोरोनावर लस शोधण्याचे काम वेगाने सुरू असलं तरी कोरोना जगातून कधी हद्दपार होणार असाच प्रश्न प्रत्येकाला पडला. दरम्यान, सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. अमेरिकेच्या फायझर कंपनीला (US pharma giant Pfizer) लस (Covid-19 vaccine) संशोधनातील तिसऱ्या टप्प्यातही मोठं यश मिळाले आहे.
ही लस (Covid-19 vaccine) तब्बल ९५ टक्के परिणामकारक असल्याचं संशोधनातून स्पष्ट झाले आहे. कोरोनाच्या १७० पैकी १६२ रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसून आले. तर अत्यंत गंभीर असलेल्या १० पैकी ९ जणांवर या लसीचा चांगला परिणाम दिसून आलाय. त्यामुळे पुढील दोन दिवसांत या लसीच्या उत्पादनाला परवानगी देण्याची मागणी फायझरने अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे मागितली आहे.
कोरोनामुळे मृत्यूशी झुंजत असलेल्या वृद्धांना तातडीनं ही लस देता येईल असे कंपनीचे म्हणणे आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर २०२०च्या डिसेंबर अखेरपर्यंत तब्बल ५ कोटी लशींचं उत्पादन करण्याचा मानस या कंपनीचा आहे. तर २०२१ मध्ये तब्बल १३० कोटी लशींचं उत्पादन करण्यात येणार आहे. अमेरिकेतील सर्व नागरिकांना ही लस मोफत देण्यात येणार आहे. अमेरिका सरकार फायझरला तब्बल दोनशे कोटी डॉलर मोजणार आहे.