Corona Update : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं थैमान, दररोज 10 लाख लोकांना होऊ शकते लागण

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पाच जणांचा मृत्यू,  चीनमधून बाहेर पडलेला नवा व्हेरियंट जगात वाऱ्यासारखा पसरत असून हा धोका आता भारतीय सीमेपर्यंत येऊन ठेपलाय

Updated: Dec 22, 2022, 07:34 PM IST
Corona Update : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं थैमान, दररोज 10 लाख लोकांना होऊ शकते लागण title=

China Corona News : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona) उद्रेक झालाय. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं चीनमध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय. त्यानंतर चीननं महत्वाच्या शहरांमधील रूग्णालयं सुसज्ज केली आहेत. मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी चीनमध्ये एकही मृत्यू झाला नाही असा दावा चीननं केलाय. यावरून WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या मनात शंकेची पाल चुकचुकलीय. चीन काहीतरी लपवाछपवी करतोय अशी शंका घेतली जातेय. 

चीनकडून रुग्णांच्या आकड्यांची लपवाछपवी
चीननं ICUमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांचे आकडे कमी दाखवण्यास सुरूवात केलीय. मात्र वस्तूस्थिती पूर्णत: वेगळी आहे.  ICUत रूग्ण दाखल करायलाही जागा नाही असं चित्र इथं पाहायला मिळतंय. ओमायक्रॉनचा (Omicron) नवा व्हेरियंट BF.7 नं चीनमध्ये धुमाकूळ घातलाय. मात्र या व्हेरियंटबाबत चीनकडून WHOला योग्य माहिती देण्यात आलेली नाही. 

दरदिवशी 10 लाख रुग्णांची नोंद होणार?
दरम्यान एका मीडिया रिपोर्टनुसार चीनमध्ये प्रत्येक 24 तासात 10 लाख कोविड रुग्ण आणि 5 हजार मृत्यूंची नोंद होऊ शकते. लंडनमधल्या एका संस्थेचा हवाला देत हा अहवाल देण्यात आला आहे. ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BF.7 मुळे पुढच्या महिन्यापर्यंत दैनंदिन रुग्णांची संख्या 3.7 मिलियनपर्यंत पोहोचू शकते अशी भीती वर्तवण्यात आली आहे. 

नवा व्हेरिएंट जगभरात पसरतोय
कोरोनाचा जन्म झाला तोच मुळे चीनमध्ये, तेव्हाही चीननं ब-याच गोष्टी लपवून ठेवल्या. मात्र चीनची ही लपवाछपवी सध्या तरी जगाला परवडण्याजोगी नाही. कारण चीनमधून बाहेर पडलेला नवा व्हेरियंट जगात वाऱ्यासारखा पसरतोय. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाचे 22 हजार 578 रूग्ण आढळून आले आहेत, जपानमध्ये 72 हजार 297, जर्मनीत 55 हजार 16, ब्राझीलमध्ये 29 हजार 579 तर दक्षिण कोरियात 26 हजार 622 नवे रूग्ण आढळले आहे. फ्रान्समध्येही 8 हजार 213 जणांना कोरोनाची लागण झालीय. चीनलगतच्या तैवानमध्ये 10 हजार 359 कोरोनाचे रूग्ण आढळून आलेत. 

भारताच्या सीमेपर्यंत धोका
याचाच अर्थ हा धोका आता भारतीय सीमेपर्यंत येऊन ठेपलाय. कोरोनाच्या बाबतीत चीन वारंवार जगाला अंधारात ठेवत आलाय. याहीवेळी चीननं जाणीवपूर्वक तीच चूक केलीय. स्वत:च्या लसी कुचकामी ठरल्यानंतरही चीननं इतरांच्या लसींवर विश्वास ठेवला नाही. त्याचीच फळं सा-या जगाला भोगावी लागणार असंच दिसतंय.