बापरे! 80 कोटी लोकांना होणार Corona ची लागण; भारताला कितपत धोका?

चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाची ही सर्वात मोठी लाट असल्याचं म्हटलं जातंय. अशातच येत्या महिन्यांत चीनमध्ये 80 कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग (Corona Ifection) होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आलाय

Updated: Dec 21, 2022, 04:44 PM IST
बापरे! 80 कोटी लोकांना होणार Corona ची लागण; भारताला कितपत धोका? title=

Corona havoc china : कोरोनाचा (Corona) धोका अजूनही टळलेला नाहीये, कारण चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोनाची मोठी लाट आली आहे. चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाची ही सर्वात मोठी लाट असल्याचं म्हटलं जातंय. अशातच येत्या महिन्यांत चीनमध्ये 80 कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग (Corona Ifection) होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. लंडनच्या ग्लोबल हेल्थ इंटेलिजंस कंपनी एयरफिनिटी (London based global health intelligence company Airfinity) यांच्या सांगण्यानुसार, चीनमध्ये झीरो कोविड पॉलिसी संपल्यानंतर 21 लाख रूग्णाचा मृत्यू होऊ शकतो. यामागील कारण हे लसीकरण आणि अंटीबॉडीजची कमी असल्याचं देखील म्हटलंय. 

60 टक्के लोकांना होणार संसर्ग

अमेरिकेतील संस्था एनपीआरमध्ये पब्लिश करण्यात आलेल्या अहवालानुसार, कोरोनाच्या या लाटेत देशातील जवळपास 60 टक्के लोकसंख्येला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. येल युनिवर्सिटीतील सार्वजनिक आरोग्यावर रिसर्च करणाऱ्या तसंच चिनी आरोग्य व्यवस्थेतील तज्ज्ञ शी चेन यांनी हा अहवाल सादर केलाय. याचाच अर्थ येणाऱ्या 90 दिवसांमध्ये पृथ्वीवरच्या तब्बल 10 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. 

तर दुसरीकडे इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स एंड इवॅल्यूएशनच्या (IHME) च्या अनुसार,  चीनच्या कडक COVID-19 निर्बंध असूनही 2023 पर्यंत एक दशलक्षाहून अधिक मृत्यू होऊ शकतात.

एप्रिल 2023 मध्ये कोविड प्रकरणं उच्चांक गाठतील

IHME च्या मते, 1 एप्रिलच्या जवळपास चीनमध्ये कोरोनाची प्रकरणं उच्चाक गाठणार आहेत. इतकंच नाही तर कोरोनामुळे मृतांचा आकडा 322,000 वर पोहोचण्याची देखील शक्यता आहे.

चीनमध्ये औषधांचा साठा संपुष्टात

अशा कठीण परिस्थितीत चीनमध्ये औषधांचा साठा जवळपास संपत आलाय. अनेक हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाहीत. अंत्यसंस्कारांसाठी अक्षरशः रांगा लागल्यायत. हॉस्पिटलमध्ये रुग्णांना जमिनीवर झोपवण्याची वेळ आलीय. चीनमधल्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये हाहाकार माजलाय. शांघाईमधल्या शाळा, कॉलेजेस बंद करण्यात आलेत.

भीतीदायक आकडे (20 डिसेंबर रोजी मृत्यू)

अमेरिका- 308
जापान- 231
ब्राझील- 216
जर्मनी- 201
फ्रान्स- 130

भारताची आरोग्ययंत्रणा अलर्टवर

चीन जपान अमेरिकेत कोरोना संकट पुन्हा वाढतंय. त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत मॅरेथॉन बैठक सुरू आहे. त्यात मास्क सक्तीचा  (Masks Mandatory) निर्णय होण्याची शक्यता आहे. ख्रिसमस आणि नवं वर्ष स्वागत लक्षात घेता ही नियमावली लागू होण्याची शक्यता आहे. देशात पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती लागू होण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे. सार्वजनिक ठिकाणांसह रेल्वे प्रवासातही मास्क सक्ती लागू होण्याची शक्यता आहे.

चीनमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने चीनमधून येणारे प्रवासी, पर्यटक यांच्याबाबत महत्वाचा निर्णय बैठकीत होण्याची शक्यता आहे.  भारत अलर्ट मोडवर असून नागरिकांसाठी काही खबरदारीच्या सूचना देण्यात आल्याचं केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी म्हटलंय. भारतात 220 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाला आहे, पुन्हा एकदा कोरोना भारतात येऊ नये यावर आज केंद्रीय पातळीवर महत्वाची बैठक होणार असल्याचं डॉ. भारती पवार यांनी म्हटलं आहे.