नवी दिल्ली : चीननं लडाखच्या सीमेवर मोठी मोर्चेबांधणी केल्याचं पुन्हा समोर आलंय. अमेरिकेच्या एका लष्करी अधिका-यानं याबाबत इशारा दिला आहे. लडाख सीमेवर चिन्यांनी पुन्हा डोकं वर काढलंय. पूर्व लडाख भागात चीननं लढाऊ विमानांची कुमक मोठ्या प्रमाणात वाढवलीये. अमेरिकन लष्कराचे पॅसिफिक कमांडिंग जनरल चार्ल्स ए फ्लीन यांनी याबाबत इशारा दिलाय.
होतान एअर बेसवर चीनची 25 फायटर जेट्स तैनात असून हा आकडा दुप्पटीपेक्षा जास्त आहे. भारताच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शाकचे इथं आणखी एक हवाई तळ उभारण्यात येतोय. याशिवाय काशगर, गारी गुन्सा, शिंगास्ते, ल्हासा गोंकार, यिंची आणि चम्बो पांग्ता इथले एअरबेस चीननं अपग्रेड केलेत. यात कायमस्वरुपी तळ, अधिक लांबीचे रन-वे उभारण्यात आलेत.
चीननं काही आगळिक केलीच, तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी भारतीय लष्करानं ठेवलीये. लडाख सीमेवर भारताचीही लष्करी आणि हवाई कुमक असून एअर डिफेन्स सिस्टिमही सज्ज आहे.
5 मे 2020 रोजी लडाखमध्ये भारत आणि चिनी सैनिकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. यात चीनला भारतापेक्षा मोठी किंमत मोजावी लागली. मात्र जेव्हा जेव्हा सीमेवर असा संघर्ष झाला तेव्हा भारतीय वायूदलाची तयारी अव्वल ठरली आणि हालचाल जलद होती. त्यामुळे बावचळलेला चीन सीमेवर तैनाती वाढवून भारताला आव्हान देण्याचा सातत्यानं प्रयत्न करतो. पण त्याचे हे प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाहीत. कारण चीन जेवढी कुमक वाढवेल, त्यापेक्षा जास्त भारताची प्रत्युत्तर देण्याची सिद्धता असेल, हे नक्की.