ब्युरो रिपोर्ट, झी २४ तास : चिनी ड्रॅगनची भारताकडे कायमच वक्रदृष्टी असते. लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न नेहमीच सुरू असतो. दक्षिण चीन समुद्रात अनेक देशांशी चीनचा वाद आहे. आता तर हिंदी महासागरात युद्ध पाणबुड्या तैनात करण्यासाठी चीननं रेकी सुरू केल्याचे पुरावे हाती आलेत.
दक्षिण चीन समुद्रातील वर्चस्वासाठी अमेरिका, जपान, तैवानशी पंगा घेणाऱ्या ड्रॅगनची वाकडी नजर आता हिंदी महासागरावर पडलीये. हिंदी महासागरात पाणबुड़्या कुठे तैनात करता येतील आणि त्यातून महासागरावर वर्चस्व कसं मिळवता येईल, याची टेहळणी चीन करतोय. गेल्या दोन वर्षांपासून चीनचा हा उद्योग सुरू आहे. हे स्पष्ट झालं ते इंडोनेशियानं आपल्या सागरी हद्दीत पकडलेल्या एका चिनी जहाजामुळे.. रडारला दिसू नये, यासाठी जहाजावरील सर्व उपकरणं बंद करण्यात आली होती.
इंडोनेशियातील कायद्यानुसार जहाजांवरील उपकरणं बंद करता येत नाहीत. जहाजावरील चिनी खलाश्यांनी उपकरणं बिघडल्याचा पोकळ दावा केला असला तरी त्यावर अर्थातच कुणाचा विश्वास नाही. या चिनी जहाजानं दोन वेळा आपले ट्रान्सपॉण्डर बंद केल्याचं इंडोनेशियन कोस्ट गार्डनं स्पष्ट केलंय. हिंदी महासागरात टेहळणी करण्यासाठी हे जहाज आलं असावं, हीच शक्यता जास्त आहे. याआधीही इंडोनेशियाजवळील समुद्रात मच्छिमारांना चीनचं सागरी ड्रोन सापडलं होतं.
चीनची ही सगळी धडपड ही हिंदी महासागरात युद्ध पाणबुड्या कुठे तैनात करता येतील, याची चाचपणी करण्यासाठी असल्याचं बोललं जातंय. भारत आणि ऑस्ट्रेलियाला शह देण्यासाठी चीननं हा कट आखल्याचं स्पष्ट आहे.
चीनच्या शी जिनपिंग सरकारचं विस्तारवादी धोरण एव्हाना सगळ्या जगाला माहित झालंय. लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न कायमच सुरू असतो. भारतीय जवानांनी प्रसंगी जीवाची बाजी लावून ही घुसखोरी रोखून धरलीये.
आता भारताच्या दक्षिणेकडे पसरलेल्या हिंदी महासागराकडे चीननं आपलं लक्ष केंद्रित केलंय. भारत, ऑस्ट्रेलियासारखे हिंदी महासागरातले मोठे देश आणि जागतिक महासत्तांनी याकडे वेळीच लक्ष देऊन ड्रॅगनच्या विस्तारवादाचा बंदोबस्त करणं आवश्यक आहे.