दुःख ऐकण्याचं दुकान! ग्राहकांना बोलावून 'हा' माणूस ऐकतो पर्सनल प्रॉब्लम आणि चहाही पाजतो

आजच्या जगात जिथे कुणाला दुःख सांगायला आणि दुःख ऐकायला वेळ नाही तिथे एका माणसाची खास चर्चा होतेय. या माणसाने चक्क दुःख ऐकण्याचं दुकान सुरु केलंय... काय आहे ही गोष्ट...

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 17, 2024, 12:20 PM IST
दुःख ऐकण्याचं दुकान! ग्राहकांना बोलावून 'हा' माणूस ऐकतो पर्सनल प्रॉब्लम आणि चहाही पाजतो title=

जीवन जगत असताना आता अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. माणूस जसजशी प्रगती करतोय तसा तो आपल्या आनंद, सुख, समाधानापासून दूर जातोय. त्याच्या भावना हावी होत आहेत यामुळे खूप मोठं नुकसान होतं. असं असताना आज कुणाला मन मोकळं करायला वेळही नाही आणि तशी व्यक्ती देखील नाही. प्रत्येकजण आपल्याच जीवनात व्यस्त आहे. असं असताना या चहावाल्याची होतेय चर्चा. जो लोकांना बोलावून त्यांना चहा पाजतो आणि दुःख, संकट ऐकून घेतो. 

हल्लीच्या धावपळीच्या जगात कुणाशी मन मोकळेपणाने बोलायला कुणीच नसताना हा माणूस चक्क 'दुःख ऐकण्याचं दुकान' उघडून बसला आहे. तो उदास लोकांना स्वतः बोलावून त्यांची दुःख, प्रॉब्लेम देखील ऐकतो. महत्वाचं म्हणजे या सगळ्यावर तो चहा पिऊन ऐकतो. चीनमध्ये एका फ्रेंच ब्लॉगरने असं चहाचं दुकान सुरु केलं आहे. तो फक्त लोकांचे प्रश्नच ऐकत नाही तर त्यांच्या समस्यांवर समाधानकारक उत्तरे देखील देतो. 

लोकांची ऐकतो दुःख 

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, रुले ऑलिव्हर हर्व (Ruelle Olivier Herve) असे या व्यक्तीचे नाव आहे. तो झेजियांग प्रांतातील हांगझोऊ शहरात राहतो आणि चिनी सोशल मीडियावर @tealovinglaolu नावाने अकाऊंट चालवतो. त्याने रस्त्यावर एक स्टॉल उघडला आहे, जिथे तो लोकांना त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी त्यांना चक्क आमंत्रित करतो. यावेळी तो त्यांना चहाही पाजतो. त्याने दोन खुर्च्या ठेवल्या आहेत, ज्यात एकावर तो स्वत: बसतो आणि दुसऱ्यावर तो पुढच्या माणसाला बसवतो आणि शांतपणे ऐकतो. यासंबंधीचे अनेक व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

लोकांकडून उपक्रमाचं कौतुक

हर्व लोकांना त्यांच्या समस्या लिखित स्वरूपात आणण्याचा सल्ला देतो आणि ते दोघेही एकत्र बसून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील. हर्वचे सोशल मीडियावर 1 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि लोक त्याने सांगितलेल्या कथा देखील खूप पसंत करतात. काही त्यांना त्यांच्या अभ्यासाच्या समस्यांबद्दल सांगतात तर काही त्यांच्या जीवनातील समस्यांबद्दल सांगतात. हर्वेही त्यांच्या बाजूने तोडगा काढण्याचा पुरेपुर प्रयत्न करतात. एवढंच नव्हे तर यूझर्स त्याच्या शांत आणि गोड स्वभावाचे कौतुक करत आहेत.