China Corona Wave : संपूर्ण जगात कोरोना रुग्णसंख्येमध्ये घट झाल्याची बाब लक्षात आली असली तरीही चीनमधून मात्र भीतीदायक वृत्त समोर आलं आहे. चीनच्या अधिकाऱ्यांकडून कोरोना विषाणूच्या संसर्गामुळं आलेल्या नव्या लाटेशी लढण्यासाठी नव्यानं लसीची मागणी करण्यात येत आहे. ज्यामुळं चीनमधील एकंदर परिस्थिती नेमकी किती भयावह आहे याचाच अंदाज संपूर्ण जगाला आला आहे.
नुकत्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात मांडल्या गेलेल्या आकडेवारीनुसार पुढच्या महिन्यात म्हणजेच जून 2023 मध्ये एका आठवड्यात चीनमध्ये 65 मिलियन म्हणजेच तब्बल 6.5 कोटी नवे कोरोना रुग्ण आढळतील. चीनमध्ये लागू असणारी झिरो कोविड पॉलिसी हचवण्यात आल्यानंतर इथं कोरोनाच्या नव्या XBB व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्येत वाढ होणार असल्याचं सांगितलं जात आहे. याच धर्तीवर सध्या चीनमध्ये कोरोनाच्या नव्या लसींना मान्यता मिळाली असून, इतर तीन ते चार लसीही येत्या काळात मंजूरी मिळाल्यानंतर वापरात येण्याचं चित्र आहे.
हाँगकाँग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ युनिवर्सिटीतील महामारीचा अभ्यास करणाऱ्य़ा तज्ज्ञांच्या मते येत्या काळात कोरोनाची गंभीर लक्षणं असणाऱ्या रुग्णसंख्येत घट होऊन मृतांचं प्रमाणही कमी होईल. पण, त्याआधी मात्र एक मोठी लाट चीनच्या आरोग्य यंत्रणेला हादरा देईल.
चीनमधील अनेक निर्बंध शिथिल केलेले असतानाच आता तिथं नव्यानं रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची बाब लक्षात येत आहे. सध्याच्या घडीला देशात जवळपास 85 टक्के लोकसंख्या कोरोनाच्या विख्याच असून, ही लाट पुढील काही दिवसांत नक्कीच ओसरेल. पण, त्यासाठी लागणारा कालावधी मात्र अद्याप सांगण्यात आलेला नाही.
दरम्यान, कोरोनामुळं चीनमधील वृद्धांचा मृत्यू होण्याचं प्रमाण अधिक असून, या धर्तीवर आता बूस्टर डोस देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले गेले पाहिजेत असं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे. चीनमध्ये थैमान घालण्यापूर्वी या कोरोनानं अमेरिकेतही हाहाकार माजवला होता. पण, 11 मे रोजी देशातील सरकारनं ही आरोग्य क्षेत्रातील आणीबाणी संपल्याचं जाहीर केलं.
दरम्यान, भारतात सध्याच्या घडीला कोरोनाच्या बाबतीत चिंतेचं वातावरण नसलं तरीही प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कता कायमच ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे. कोरोनाच्या बाबती जरासा हलगर्जीपणा भारतालाही संकटाच्या छायेत लोटू शकतो ही बाब नाकारता येत नाही.