Corona News : दोन वर्षांतील सर्वाधिक रुग्णसंख्यावाढ; 10 शहरांमध्ये लॉकडाऊन

लॉकडाऊन नाही ना लागणार, भीतीचं वातावरण...काळजी घ्या

Updated: Mar 15, 2022, 11:43 AM IST
Corona News : दोन वर्षांतील सर्वाधिक रुग्णसंख्यावाढ; 10 शहरांमध्ये लॉकडाऊन  title=
प्रतिकात्मक छाय़ाचित्र

Corona news : दोन वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसचा प्रसार अतिशय झपाट्यानं झाला आणि पाहता पाहता आपण सर्वजण या विषाणूच्या विळख्यात आलो. चीनपासून सुरुवाच झालेल्या या महामारीनं संपूर्ण जगाचा श्वास कोंडला आणि अक्षरश: मानवी जीवन कोलमडून पडलं. 

चीनमध्येच आता पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं असल्याची बातमी समोर आली आहे. ज्यामुळं आता पुन्हा एकदा कोरोनाच्या संक्रमणाचा विस्तार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

मंगळवारी चीनमध्ये कोरोनाचे एकूण 5280 रुग्ण आढळले. कोरोनाच्या सुरुवातीपासूनची आचापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेल्यामुळं सध्या आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. 

तिथं WHO नं दिलेल्या माहितीनुसार डेल्टा आणि ऑमायक्रॉन हे दोन्ही व्हॅरिएंट मिळून एक नवा व्हॅरिएंट तयार होत आहे, ज्यामुळं कोरोनाची चौथी लाट पुन्हा एकदा देशावर धोक्याचं सावट आणू शकते. 

दरम्यान, सध्या चीनमध्ये कोरोना अतिशय झपाट्यानं पसरू लागल्यामुळं देशात आतापर्यंत 10 शहरांत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. जवळपास 3 कोटींहून अधिक नागरिकांनी स्वत:ला पुन्हा घरात कैद करून घेतलं आहे. 

कोरोनाच्या या नव्या लाटेचा जिलीन प्रांतावर सर्वाधित परिणाम दिसून येत आहे. मागील आठवड्यापासूनच चीनमध्ये कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं दिसून आलं. 

गेल्या आठवड्यामध्ये बिजींग, शांघाय, ग्वांगडोंग, जिआंग्सू, शेडोंग, झेजियांग प्रांतात कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. कोरोनाचं हे वाढतं प्रमाण पाहता आता इतर राष्ट्रही सतर्क झाली असल्याचं दिसून येत आहे. 

पहिल्या लाटेप्रमाणे परिस्थिती नियंत्रणाबाहेर न जाता या विषाणूशी झुंज देण्यासाठीच सर्व देशातील आरोग्य यंत्रणा कामाला लागल्या आहेत.