बिजिंग : चीनमध्ये मोठे हिंसक आंदोलन सुरु झालं आहे. चीनमध्ये मोठा बँकिंग घोटाळा उघड झाला आहे. त्यामुळे लाखो खातेदारांचे बँक खाती गोठवण्यात आली आहे. नागरिकांचे हक्काचे पैसे गेल्यानं नागरिक संतप्त झाले आहेत.
नागरिकांनी बँकांबाहेर आंदोलनं सुरु केल्यानं बँकांसमोर चक्क रणगाडे तैनात करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ हेनान प्रांतातील आहे. बँकेबाहेर अनेक रणगाडे तैनात केल्याचे दिसत आहेत.
लोकांनी बँकेत घुसू नये म्हणून आंदोलन दडपण्यासाठी हे रणगाडे उभे करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हा घोटाळा 40 अब्ज युआन म्हणजेच ६ अब्ज अमेरिकी डॉलर एवढा असल्याचे सांगण्यातय येतं आहे.
चीनच्या नागरिकांवर ही वेळ का आली?
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चीनमधील बहुतांश बँकांची स्थिती चांगली नाही. येथील बँकांमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. बँकांमध्ये जमा केलेले 40 अब्ज युआन म्हणजेच सुमारे 6 अब्ज अमेरिकन डॉलर्स गायब झाले आहेत.
हेनान आणि अनहुई प्रांतातील रहिवाशांना बँक खाते वापरण्यासाठी बॅन करण्यात आलं होतं एप्रिल 2022 पासून कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांना बँक खाती गोठवण्यात आली होती. पैसे काढण्याची परवानगी नसल्याने संतप्त नागरिकांनी आक्रमक होऊन बँकांविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.
लोकांचं तीव्र आंदोलन चिरडण्यासाठी चीन सरकारने अखेर रनगाडे आणि फौजा उभ्या केल्या. यामुळे चीनमध्ये सध्या असंतोषाचं वातावरण आहे. आंदोलक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.