नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग एकाच जागी थांबलं आहे. भारतासहित अनेक देशांमध्ये १ महिन्याहून अधिक काळ लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा हे अमेरिकेत अडकले आहेत. ते वैयक्तिक कारणासाठी अमेरिकेत गेले होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ते परतणार होते. पण २३ मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणावर बंदी आल्याने ते अमेरिकेतच राहीले आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त अरोरा निवडणूक आयोगाचे महत्वपूर्ण निर्णय व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेत आहेत. ते अमेरिकेतूनच महत्वपूर्ण कामं करतं असून लॉकडाऊन संपण्याची वाट पाहत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार १० मार्च रोजी ते वैयक्तिक प्रवासानिमित्ताने अमेरिकेत गेले. ४ एप्रिलला ते भारतात परतणे अपेक्षित होते. निवडणूक आयोगाचे इतर दोन सदस्य अशोक लवासा आणि सुशील चंद्र यांच्या ते सतत संपर्कात आहेत.
लॉकडाऊनचे गांभीर्य पाहता निवडणूक आयोग देखील सोबत असल्याचे सुनील अरोरा यांनी म्हटले होते. या लढाईत निवडणूक आयोगाला देखील पगार कपात करावी लागेल असे ते म्हणाले. ते आणि इतर दोन सदस्य वर्षभर पगारात ३० टक्के कपात करत असल्याचेही त्यांनी सांगितले होते.