Diwali 2021 : जगभरातील नेत्यांनी अशी साजरी केली दिवाळी

जगभरात मोठ्या उत्साहात साजरी होतेय दिवाळी...

Updated: Nov 5, 2021, 09:08 PM IST
Diwali 2021 : जगभरातील नेत्यांनी अशी साजरी केली दिवाळी title=

मुंबई : दिवाळीचा (Diwali 2021) सण जगभरात आणि देशभरात उत्साहात साजरा होत आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर देशभरातील लोकांना खूप दिवसांनी अशी आनंदाची संधी मिळाली आहे. यावेळी लोकांमध्ये उत्सवाबाबत प्रचंड उत्साह दिसून आला. यानिमित्ताने भारतच नव्हे तर जगभरातील सर्व देश दिवाळीच्या जल्लोषात तल्लीन झालेले पाहायला मिळाले.

व्हाईट हाऊसने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

या प्रसंगी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) आणि त्यांची पत्नी जिल बायडेन यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळीला अधिक अर्थपूर्ण अर्थ आहे. ते म्हणाले, 'राष्ट्रपती आणि प्रथम महिला (राष्ट्रपतींच्या पत्नी) या नात्याने व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करताना एकत्र दिवा लावणे हा आमच्यासाठी सन्मान आहे. प्रकाशाचा हा सण अमेरिका, भारत आणि जगभरातील एक अब्जाहून अधिक हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध लोक साजरा करतात.

बायडेन यांनी त्यांची पत्नी जिल बायडेनसोबत व्हाईट हाऊसमध्ये दिवा लावतानाचा फोटो शेअर केला होता.

बायडेन यांच्याशिवाय अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनीही ट्विटरवर दिवाळीच्या शुभेच्छा देणारा व्हिडिओ जारी केला आहे. त्या म्हणाल्या की, जगभर दिव्यांचा सण साजरा केला जात आहे. पण यावेळी दिवाळीचा अर्थ फार वेगळा आहे. या वर्षीची दिवाळी विनाशकारी महामारीच्या काळात आणखी खोल अर्थ घेऊन येत आहे. ही सुट्टी आपल्याला आपल्या देशातील सर्वात पवित्र मूल्यांची आठवण करून देते.

कोरोना महामारीत ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. कमला हॅरिस म्हणाल्या की, या आपत्तीत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. दु:खात एकमेकांचा हात धरून चालणे म्हणजे माणुसकी.

यूकेच्या पंतप्रधानांनीही दिल्या शुभेच्छा

याशिवाय ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. जॉन्सन म्हणाले की, आपल्या सर्वांसाठीच्या कठीण काळानंतर, मला आशा आहे की ही दिवाळी खरोखरच खास असेल. वर्षातील हा काळ कुटुंब आणि मित्रांना भेटण्यासाठी असतो. गेल्या नोव्हेंबरचा विचार केला तर आपण खूप पुढे आलो आहोत यात शंका नाही.