MDH and Everest Masala : एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाले भारतीयांसाठी नवे नाहीत. अनेक वर्षांपासून अनेक घरांमध्ये या मसाल्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर झाल्याचं पाहायला मिळालं. पण, याच मसाल्यांवर परदेशात मात्र बंदी घालण्यात आली असून, सिंगापूर आणि हाँगकाँगमागोमाग नेपाळची दारंही या दोन कंपन्यांच्या मसाल्यांसाठी बंद झाली आहेत.
नेपाळमध्ये भारताच्या एव्हरेस्ट, एमडीएच मसाल्यांच्या विक्री आणि आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. नेपाळमधील अन्न गुणवत्ता नियंत्रण विभागानं या मसाल्यांमध्ये एथिलीन ऑक्साईड असण्याच्या संशयावरून बंदीचे हे निर्देश दिले आहेत. सध्या या मसाल्यांची तपासणी सुरु असून, त्यात एथिलीन ऑक्साईडचे अंश शोधण्यासाठीचं परीक्षण सुरु करण्यात आलं आहे.
नेपाळमधील अन्न गुणवत्ता नियंत्रण विभागाचे प्रवक्ते मोहन कृष्ण महाराजन यांनी देशात एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवरी आयातबंदीच्या वृत्ताला दुजोरा दिला. सोबतच बाजारपेठांमध्येही या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. काही देशांच्या अहवालामध्ये या मसाल्यांमध्ये हानिकारक घटक असल्याची बाब समोर येताच हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या घडीला नेपाळमध्ये या मसाल्यांचं परीक्षण सुरू असून त्यांचा परीक्षण अहवाल समोर येईपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.
एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांना कैक दशकांपासून भारतातील घराघरात स्थान मिळालं. इतकंच नव्हे, तर परदेशातही भारतीय पद्धतीच्या जेवणांमध्ये हे मसाले सर्रास वापरले जात होते. मात्र जगभरात व्यापार असणाऱ्या या मसाला उत्पादन कंपन्यांना काही दिवसांपूर्वीच मोठा धक्का बसला, कारण या मसाल्यांमध्ये हानिकारक घटक आढळल्याची बाब परीक्षणातून समोर आली.
सध्याच्या घडीला काही देशांनी एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांच्या वापरावर बंदी घातली असून येत्या काळात ब्रिटन, न्यूझीलंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही हा कठोर नियम लागू केला जाण्याची चिन्हं आहेत. फक्त ही दोन उत्पादनंच नव्हे, तर भारतातून येणाऱ्या सर्व मसाल्यांच्यामधील घटकांचं परीक्षण केलं जाणार असल्याची माहिती ब्रिटनच्या अन्न सुरक्षा एजन्सीनं दिली आहे.
एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांमध्ये आढळलेला एथिलीन ऑक्साइड हा एक रंगहीन वायू आहे. सर्वसामान्य तापमानात असताना त्यातून गोड सुवास येतो. NCI अर्थात नॅशनल कॅन्स इन्स्टीट्यूटच्या माहितीनुसार या वायूचा वापर एथिलीन ग्लाइकोल (अँटी फ्रीज) सारख्या रसायनांच्या निर्मितीसाठी केला जातो. त्याशिवाय या घटकाचा वापर कापड, साबण, फोन, औषधं आणि तत्सम पदार्थांच्या निर्मितीसाठी केला जातो. अन्नपदार्थांमध्ये होणारा त्यांचा वापर कमी असला तरीही त्याची गणती 'ग्रुप-1 कार्सिनोजेन' अर्थात कॅन्सरसाठी कारणीभूत ठरु शकणाऱ्या घटकांमध्ये केली जाते. ज्यामुळं तातडीनं अनेक देश सावधगिरीची पावलं उचलताना दिसत आहेत.