दावोस : अमेरिकेच्या सिनेटमध्ये ट्रम्प यांच्यावर सुरू असलेली महाभियोगाची सुनावणी अंतिम टप्प्यात आलीये. अशा वेळी रिपब्लिकन सिनेटर्सनी ट्रम्प यांच्यापेक्षा राष्ट्राला महत्त्व द्यावं, अशी भावनिक साद डेमोक्रेटिक काँग्रेसमन घालतायत. अमेरिकन जनतेला त्यांचा विश्वास असलेला आणि स्वतःपेक्षा राष्ट्राला महत्त्व देणारा राष्ट्राध्यक्ष हवा आहे. आता डोनाल्ड ट्रम्प जसं वागतायत तशा अध्यक्षावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, अशा शब्दांमध्ये हाऊस इम्पिचमेंट मॅनेजर एडम चिफ यांनी अमेरिकन सिनेटर्सना महाभियोग प्रस्ताव स्वीकारण्याचं आवाहन केलंय.
अध्यक्षीय निवडणुकीतील संभाव्य डेमोक्रॅट उमेदवार जो बायडन यांची चौकशी करण्यासाठी ट्रम्प यांनी युक्रेनवर दबाव आणल्याचा आरोप हाऊस इम्पिचमेंट मॅनेजर्सनी पुन्हा एकदा केला. यावर ट्रम्प यांच्या वकिलांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय.
या सुनावणीसाठी चार साक्षीदारांना बोलावण्याचा प्रस्ताव सिनेटनं बहुमतानं फेटाळला. यामुळे डेमोक्रॅट्सनी नाराजी व्यक्त केली असताना ट्रम्प यांनी मात्र या कृतीचं जोरदार समर्थन केलंय.
डेमोक्रॅट्सच्या हाऊसमध्ये आम्हाला वकील देऊ दिला नाही. एकही साक्षीदार बोलावला नाही. आता रिपब्लिकनच्या सिनेटमध्ये त्यांना साक्षीदार बोलवायचे आहेत. त्यांना आधीच संधी होती, पण त्यांना घाई लागली होती. काँग्रेसच्या इतिहासातील ही सर्वात भ्रष्ट सुनावणी आहे.
असं ट्विट ट्रम्प यांनी केलंय.
एकूणच सिनेटचा नूर पाहता रिपब्लिकन्स आणि डेमोक्रॅट्स पार्टी-लाईनवर मतदान करतील, हे आता स्पष्ट होतंय. सिनेटमध्ये रिपब्लिकन्सचं बहुमत आहे आणि महाभियोग स्वीकारला जाण्यासाठी दोन तृतियांश बहुमत आवश्यक आहे. त्यामुळे प्रस्ताव फेटाळला जाणार, हे जवळपास निश्चित आहे. पण या निमित्तानं ट्रम्प आणि रिपब्लिकन्सना जनतेच्या न्यायालयात खेचणं हाच डेमोक्रॅटिक पक्षाचा उद्देश आहे आणि तो सफल होताना दिसतोय.