नवी दिल्ली : दहशतवादी संघटना अल कायदाचा प्रमुख राहिलेल्या ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलंय. अमेरिकेच्या मीडिया रिपोर्टसनुसार हमजाच्या मृत्यूमागे अमेरिकेचा हात आहे की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अमेरिकेकडून अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. याबद्दल अमेरिकन सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांच्याकडे हमजा यांच्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यानं काहीही स्पष्ट करण्यास नकार दिला.
उल्लेखनीय म्हणजे, मार्च २०१९ मध्ये अमेरिकेनं हमजा बिन लादेनची माहिती सांगणाऱ्यास १० लाख डॉलर एवढं बक्षीस देण्याची घोषणा केली होती.
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला हमजा बिन लादेन ठार झाल्याची सूचना मिळाल्याचं, वृत्त 'द एनबीसी न्यूज'नं तीन अधिकारी सूत्रांच्या हवाल्यानं दिलंय. हमजा याचा मृत्यू कुठे आणि कसा झाला? याची माहिती मात्र अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली नाही.
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला हमजा ठार झाल्याबद्दल काही सूचना आहे का? असा प्रश्न अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी याबद्दल कुठलीही टिप्पणी करण्यास नकार दिला.