मुंबई : US House Speaker Nancy Pelosi lands in Taiwan amid China threats: अमेरिकेच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी तैवानच्या राष्ट्राध्यक्ष यांची भेट घेतली आहे. त्यामुळे चीन अॅक्शन मोडवर आहे. त्यामुळे जगावर पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले आहेत. तैवानजवळ चीनकडून युद्धाभ्यास करण्यात येत आहे. दरम्यान, चीनची दादागिरी झुगारुन अमेरिकन संसद अध्यक्षा नॅन्सो पेलोसी तैवानमध्ये दाखल झाल्याने चीनचे पित्त खवळले आहे. तर दुसरीकडे आम्ही कायम तैवानसोबत असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी चीनने अमेरिकेलाच धमकी दिली आहे.
चीनने अमेरिकेला युद्धाची धमकी दिली आहे. चिनी सेना कमालीची आक्रमक झाली आहे. याला पलटवार म्हणून अमेरिकेनेही तयारी सुरु केली आहे. अमेरिकन नौदल इंडो पॅसिफीकमध्ये दाखल झाले आहे. अमेरिकेच्या ताकदवान युद्धनौका तैवानजवळ आल्या आहेत. चिनी लष्कराने कोणताही हल्ला केला तर थेट अमेरिका युद्धात उतरेल, असा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेची बलशाली महाविनाशक एअरक्राफ्ट कॅरियर युएसएस रोनाल्ड रिगन तैनात करण्यात आली आहे.
यावेळी तैवानच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिका आमने सामने आहेत. अमेरिकेच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी तैवानच्या दौ-यावर आहेत. त्यांनी आज सकाळी तैवानच्या अध्यक्ष साई वेन यांची भेट घेतली. अमेरिका ही भक्कमपणे तैवानच्या पाठिशी उभी असल्याचं स्पीकर पेलोसी यांनी म्हटलंय. चीनने या भेटीविरोधात आधीच अमेरिकेला थेट वॉर सिग्नल दिलाय. लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी अमेरिका कायम तत्पर आहे. हुकुमशाही राजवटी अमेरिकेला मान्य नाहीत असं पेलोसी यांनी ठणकावलंय. तर तैवान कोणत्याही धमक्यांना भीक घालत नाही असं तैवानच्या अध्यक्ष साई वेन यांनी खडसावलंय.
चीनच्या धमकीला भीक न घालता अमेरिकन स्पीकर तैवानमध्ये दाखल झाल्याने चिनी एअरफोर्सच्या 21 फायटर जेट्सनी तैवानच्या हवाई हद्दीचा भंग करत तैवानच्या आकाशात घुसखोरी केली. दरम्यान, चीनने आता तैवानच्या पूर्वेला थेट क्षेपणास्त्रांसह युद्धाभ्यास सुरु केला आहे. तैवान स्ट्रेटमध्ये चीनने लाँग रेंज फायर ड्रील्स सुरु केली आहेत. 4 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान चीन संपूर्ण तैवानच्या भोवती समुद्रात क्षेपणास्त्रांसह युद्धाभ्यास सुरू करणार आहे. याशिवाय तैवानच्या लष्करी तळांवरही चीन हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुसरीकडे तैवाननंही दंड थोपटले असून लष्कराला दुसऱ्या लेव्हलच्या अलर्टवर ठेवण्यात आलंय. सर्व लष्करी अधिका-यांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्यात. एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना आता चीन आणि तैवानमध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यता प्रचंड वाढली आहे.