...अन् बंडखोर मागे फिरले! मॉस्कोबरोबरच पुतीन सरकार थोडक्यात वाचलं; नक्की काय जादू झाली?

Wanger Chief Yevgeny Prigozhin Called Off Rebellion Against Putin: शनिवारी दुपारच्या सुमारास पुकारण्यात आलेलं बंड मोडून काढण्यात रशियन सरकारला म्हणजेच पुतिन सरकारला 24 तासांच्या आत यश आलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 25, 2023, 09:17 AM IST
...अन् बंडखोर मागे फिरले! मॉस्कोबरोबरच पुतीन सरकार थोडक्यात वाचलं; नक्की काय जादू झाली? title=
बंडखोरांनी मॉस्कोपासून 200 किमीवर असतानाच माघार घेतली

Yevgeny Prigozhin Called Off Rebellion Against Putin: 'वॅगनर ग्रुप'चे (Wagner Group) प्रमुख येवगेनी प्रोगोझिन (Yevgeny Prigozhin) यांच्या नेतृत्वाखाली रशियन सरकार आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याविरोधात पुकारलेलं बंड मागे घेण्यात आलं आहे. या निर्णयामुळे पुतिन यांच्यावरील मोठं संकट सध्या तरी टाळलं गेलं आहे. मॉस्कोच्या दिशेन वाटचाल करत असलेल्या 'वॅगनर ग्रुप'ने आपली वाटचाल थांबलवी आहे. हा संघर्ष रक्तरंजीत असेल आणि तोच आपल्याला टाळायचा आहे असं सांगत प्रोगोझिन यांनी सैन्याला थांबण्याचे आदेश दिले.

नेमकं काय ठरलं?

पुतिन यांचे निकटवर्तीय असलेले प्रोगोझिन यांनी आपलं सैन्य मोस्कोपासून 200 किलोमीटर अंतरावर असल्याचं शनिवारी जाहीर केलं होतं. दुसरीकडे 'वॅगनर ग्रुप' मजल दरमजल करत राजधानीच्या शहराकडे चाल करुन येत असल्याने रशियन सरकारनेही मॉस्कोला वाचवण्यासाठी पूर्ण तयारी केलेली. मॉस्कोला चारही बाजूंनी वेढलं होतं. तसेच मॉस्कोकडे येणारे अनेक रस्तेही खोदून ठेवण्यात आलेले. मॉस्कोमधील लोकांनी घरांबाहेर पडू नये असं सांगण्यात आलं होतं. मात्र रशियन सरकारबरोबर बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेनंतर प्रोगोझिन यांनी माघार घेण्याची तयारी दर्शवली.  रोस्तोव शहरामधील ताब्यात घेतलेल्या लष्करी केंद्रावरील ताबा 'वॅगनर ग्रुप'ने सोडला. प्रोगोझिन हे बेलारुसमध्ये जाणार असून त्यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारचा खटला चालवला जाणार नाही असं आश्वासन क्रेमलिन म्हणजेच रशियन सरकारकडून देण्यात आलं आहे.

शनिवारी नाट्यमय घडामोडी अन् माघार

येवगेनी प्रोगोझिन यांचं खासगी लष्कर असलेल्या 'वॅगनर ग्रुप'ने शनिवारी दुपारी अचानक युक्रेनमधून (Russia Ukraine War) यू-टर्न घेत थेट मॉस्कोवर चाल करण्यास सुरुवात केली. अनेकदा मदत मागितल्यानंतरही दारुगोळा, लष्करी मदत पुरवली जात नसल्याने आमच्या सैनिकांचे जीव धोक्यात आले आहेत, असं प्रोगोझिन यांनी म्हटलं होतं. 'वॅगनर ग्रुप'ला युक्रेनमध्ये युद्धासाठी पाठवून रसद थांबवल्याने ही तुकडी अडचणीत आलेली. त्यामुळेच त्यांनी बंडखोरी करत थेट मॉस्कोला आव्हान दिलं. पुतिन यांना सत्तेतून पायउतार करायला भाग पाडणार असंही प्रोगोझिन यांनी म्हटलं होतं. प्रोगोझिन हे आधी पुतिन यांचे स्वयंपाकी होते. त्यांच्याच कल्पनेतून पुतिन यांच्या पाठिंब्याच्या आधारे खासगी लष्कर स्थापन केलं होतं. याच लष्कराचा वापर रशियाने अनेक ठिकाणी यापूर्वीही केला आहे. मात्र युक्रेनमधील युद्धात हे खासगी लष्कर आणि रशियन सरकारमधील मतभेद उफाळून आले आणि पुतिन यांच्या 2 दशकांहून अधिकच्या वर्चस्वाला धक्का बसतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली.