महिलांचा तिरस्कार करणाऱ्या तालिबानची पहिल्यांदाच महिला अँकरला मुलाखत

तालिबानची महिला अँकरला मुलाखत, तालिबान नरमतंय की सत्तेसाठी नाटक... ढोंग करतंय

Updated: Aug 18, 2021, 08:35 PM IST
महिलांचा तिरस्कार करणाऱ्या तालिबानची पहिल्यांदाच महिला अँकरला मुलाखत title=

काबुल: अफगाणिस्तानात फार वेगानं सध्या घडामोडी घडत आहेत. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर सर्वत्र तणावाचं वातावरण आहे. बुरखा खरेदीकरण्यासाठी महिलांची दुकानांबाहेर तुफान गर्दी आहे. तर तालिबान तिथल्या लोकांना आपली भूमिका स्पष्ट करण्याच्या तयारीत आहेत. तालिबानी आपला मेसेज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता मीडियाचा वापर करण्याचं तंत्र अवलंबल्याचं दिसत आहे. त्यातून त्यांनी आपली इमेजही बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.

तालिबानच्या प्रवक्याने पहिल्यांदाच महिला अँकरला मुलाखत दिली आहे. या घटनेमुळे सर्वजण तालिबानच्या या भूमिकेकडे आश्चर्याने पाहात आहेत. अफगाण महिला अँकर बेहेश्ता यांना तालिबान प्रवक्ता अब्दुल हक हम्मादने मुलाखत दिली आहे. 

अफगाणिस्तानच्या टीव्ही चॅनल टोलो न्यूजवर ही मुलाखत झाली. अफगाण महिला अँकरला लिबान प्रवक्ता अब्दुल हक हम्मादने मुलाखत दिली. यावेळी त्याने पुढच्या योजनांवरही चर्चा केली आहे. अफगाणिस्तानमध्ये शांतता राखण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुढाकार घेईल अशी भूमिकाही त्याने यावेळी मांडली. सध्या त्याच्यासाठी लोकांचं मन आणि डोकं जिंकणं महत्त्वाचं आहे. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर एक चांगली प्रतिमा निर्माण करण्यासोबतच तालिबानसोबत काम करू शकतो अशी प्रतिमा जगासमोर उभी करण्याचा प्रयत्न असेल असंही अब्दुल हक हम्मादने यावेळी म्हटलं आहे. याशिवाय तिथल्या स्थानिक मीडियाला स्वातंत्र्य देण्याचा दावाही त्याने केला आहे. 

अफगाणिस्तानमध्ये प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य मिळणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तालिबान नवीन प्रशासनाला कठोर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर कठोर निर्बंध लादू शकतो. सध्या टोलो न्यूजच्या सीईओच्या म्हणण्यानुसार, ' मी स्वत: काही काळ सरकारमध्ये राहणार आहे. तुम्ही टीका करायला सुरुवात केली तर? जोपर्यंत तुम्ही सरकारवर टीका करत नाही तोपर्यंत तुम्हाला हवे ते प्रसारित करू शकता?' असं ते म्हणाले आहेत.