''मी घाबरत होते, कारण तालिबान्यांनी मला रस्त्यावर पाहिलं तरी गोळी घालतील''

'माझा त्यांच्यावर भरवसा नाही! मला त्यांची खूप भीती वाटते...मी घराबाहेर पडले तर गोळ्या घालतील'

Updated: Aug 20, 2021, 07:05 PM IST
''मी घाबरत होते, कारण तालिबान्यांनी मला रस्त्यावर पाहिलं तरी गोळी घालतील'' title=
प्रातिनिधिक फोटो

काबूल: अफगाणिस्तानात तान्हा बाळापासून ते महिलांपर्यंत अनेक जण आजही भीतीच्या छायेखाली आहेत. नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे की ज्यामध्ये महिला आपल्या तान्हुल्याला अमेरिकन सैन्याकडे सोपवते. तालिबनने कब्जा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. अनेक महिलांची भीतीपोटी झोप उडाली आहे.

अफगाणिस्तानमधील एक महिलेनं तिथली आपबिती सांगितली. जेव्हा तालिबान अफगाणवर कब्जा मिळवत होते तेव्हा तिथली परिस्थिती काय होती? तिथे काय वातावरण होतं? या सगळ्यासंदर्भात महिलेनं माहिती दिली आहे. तिथे सांगितलेली कहाणी अंगावर काटा आणणारी आहे. शिवाय या महिलेला आता भविष्याची देखील चिंता सतावत असल्याचं तिने सांगितलं आहे. 

महिला म्हणते, ''मी सगळी माझं सगळं काम आवरून ऑफिसला पोहोचले होते. तिथे एकमात्र सुरक्षा गार्ड होते बाकी कोणच नव्हतं. मात्र थोडं विचित्र वाटलं. खूप कमी लोक होते. काहीतरी चुकतंय असं वाटत होतं. मनात एक वेगळीच हुरहुर होती. तालिबानी शहराच्या प्रवेशद्वारावर पोहोचले होते. पण इतक्या लवकर ते संपूर्ण तालिबान ताब्यात घेतील याची कल्पनाही कोणी केली नव्हती.''

''दुपारी मी ऑफिसमधून निघाले. काही महत्त्वाची कागदपत्र सोबत घेतली. आपला फोन, चार्जर आणि आवश्यक गोष्टी सोबत घेतल्या. आपल्याजवळ थोडे पैसे असायला हवेत या विचाराने तातडीनं बँकेची वाट धरली. प्रत्येकजण बँकेत येऊन शक्य होईल तेवढे पैसे काढण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळे बँकेत भलीमोठी रांग होती.  पण पैसे काढल्याशिवाय घरी जायचं नाही असं ठरवलं.''

''मी बँकेत असताना आई फोन करत होती. तिच्या आवाजात एकप्रकारची भीती आणि चिंता होती. तिने लवकर घरी येण्याचा आग्रह धरला. तर माझा भाऊ मला आणण्यासाठी निघाला. रस्त्यावर भयंकर ट्रॅफिक होतं. सर्वजण शक्य तेवढ्या लवकर देश सोडून जाण्याच्या तयारीत होते. मी आतून खूप जास्त घाबरले होते.''

''मी ऑफिसच्या वेशात होते. तालिबान्यांनी मला पाहिलं तर गोळ्या घालतील ही भीती मनात घर करून होती. मी तशीच टॅक्सी शोधायला निघाले मात्र रस्त्यावर खूप जास्त ट्रॅफिक होतं. मी पळत घर गाठायचं ठरवलं. मनात धाकधूक वाढत होती. कारण या क्षणी मला जीव वाचवायचा होता. तालिबान्यांपासून लपायचं होतं.'' 

''मला पळताना ऑफिसच्या वेशात पाहिलं तर गोळ्या घालून ठार मारतील ही भीती होती. जवळपास 2 तासांनंतर मी कशीबशी घरी पोहोचले. सुटकेचा निश्वास टाकण्याऐवजी भीतीनं कापत होते. तो दिवस कधीच विसरता येणार नाही. कुठल्याही क्षणी तालिबानी येऊ शकतात आणि सगळं संपू शकतं ही भीती ही दहशत मनात होती. ती रात्र मी झोपूच शकले नाही.'' 

''मी त्यावेळी देश सोडून जाण्यासाठी विजाचा खटाटोप करू लागले. माझ्या नातेवैकांकडे जाण्याचा पर्यायही होता. मात्र पुन्हा एकदा तीच भीती होती. तालिबान्यांनी पाहिलं तर गोळ्या घालतील. त्यामुळे घराबाहेर पडण्याचीही हिंमत होत नव्हती. सध्या मी घरात सुरक्षित आहे. मात्र अजूनही मला भीती आहे ती माझ्या भविष्याची. कारण तालिबानी मला नोकरी करू देतील का? एकूण सध्याची परिस्थिती पाहता सगळंच कठीण असल्यानं ती चिंता लागून राहिल्याचं म्हटलं आहे.''