वडिलांच्या निधनानंतर मुलीला त्यांच्या बॅगेत सापडलं असं काही; थेट लष्कराला बोलवावं लागलं अन्...

कॅनडात एका महिलेला वडिलांच्या मृत्यूनंतर घराची साफसफाई करताना असं काही सापडलं की, ज्यामुळे तिला धक्काच बसला. महिलेला थेट लष्कराला पाचारण करावं लागलं.   

शिवराज यादव | Updated: Mar 19, 2024, 01:34 PM IST
वडिलांच्या निधनानंतर मुलीला त्यांच्या बॅगेत सापडलं असं काही; थेट लष्कराला बोलवावं लागलं अन्... title=

आई-वडील किंवा घऱातील ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या सामानात अनेकदा आठवणींचा साठा सापडतो. जुने फोटो, वस्तू, डायरी त्यांनी आयुष्यभर जपून ठेवलेल्या असतात. त्यांच्या मृत्यूनंतर मुलं, नातू यांना ती मिळतात. पण अनेकदा यातील एखादी वस्तू किंवा गोष्ट तुम्हाला आश्चर्यचकितही करु शकते. कॅनडात असाच एक प्रकार घडला आहे, ज्यामध्ये मुलीला अशी वस्तू सापडली की थेट लष्कराला बोलवावं लागलं. 

कॅनडाच्या क्युबेकमधील घरात हा प्रकार घडला आहे. केड्रिन सिम्स ब्राचमन वडिलांच्या निधनानंतर घराची साफसफाई करण्यासाठी पोहोचली होती. तिच्यासह कुटुंबातील काही अन्य सदस्यही होते. ऑक्टोबर महिन्यात त्यांचं निधन झालं होतं. 

स्वच्छता करत असताना केड्रिनला एक टूल बॉक्स सापडला. यात जे मिळालं ते पाहिल्यानंतर केड्रिनला धक्काच बसला. ही वस्तू पाहिल्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. याचं कारण यानंतर त्यांना थेट लष्कराला बोलवावं लागलं. त्यांनी सीटीव्हीशी संवाद साधताना सांगितलं की, "आम्ही त्यांच्या टूल रुममध्ये गेलो होतो. मी तिथे काहीतरी शोधत होते. यावेळी मी टूलबॉक्स उघडला असता तिथे एक लाईव्ह ग्रेनेड होतं. मी काही वर्षांपूर्वी हा ग्रेनेड पाहिला होता. पण तो आता नष्ट झाला आहे असं मला वाटलं होतं".

केड्रिनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. तिने लिहिलं आहे की, "मला 30 वर्षांपूर्वीचा हा ग्रेनेड अजूनही लक्षात आहे. माझे वडील आजोबांच्या घरुन घेऊन आले होते. आश्चर्याची बाब म्हणजे आम्ही इतकं घऱं बदलली. पण यादरम्यान तो सामानातच होता आणि आम्हाला साधा पत्ताही लागला नाही".

केड्रिनने यानंतर पोलिसांशी संपर्क साधला. ग्रेनेडचे फोटो काढण्यासाठी पोहोचलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, लष्कराला घरी बोलावण्याची गरज होती. लष्कराच्या जवनांनी सांगितलं की, ग्रेनेड जिवंत होता. तसंच जुनं ग्रेनेड सापडण्याचं हे दुर्मिळ प्रकरण आहे. 

लष्कराने हे ग्रेनेड ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या घटनेनंतर क्रेडिन यांनी वडिलांबद्दलची उत्सुकता वाढली असल्याचं सांगितलं आहे.