"हे दृश्य फार चांगलं दिसतंय का?", जीममध्ये महिलेने अंध तरुणाला फटकारलं; टक लावून पाहत असल्याचा आरोप

आपण जीममध्ये व्यायाम करत असताना एका महिलेने आपल्यावर तिच्याकडे एकटक पाहत असल्याचा आरोप केला. तरुणाने आपण अंध आहोत असं सांगितलं, पण महिलेने विश्वास ठेवला नाही.   

शिवराज यादव | Updated: Jun 22, 2023, 03:03 PM IST
"हे दृश्य फार चांगलं दिसतंय का?", जीममध्ये महिलेने अंध तरुणाला फटकारलं; टक लावून पाहत असल्याचा आरोप title=

आपण अंध असतानाही एका महिलेने आपल्यावर तिच्याकडे एकटक पाहत असल्याचा आरोप केल्याचा दावा एका तरुणाने केले आहे. या घटनेनंतर त्याला जीमच्या बाहेर काढण्यात आलं होतं. 21 वर्षीय टॉबी एडिसनने आपल्यासह झालेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. जीममध्ये व्यायाम करत असताना ही घटना घडल्याची माहिती त्याने दिली आहे. टॉबी असं या तरुणाचं नाव असून तो सोशल मीडियावर सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या आयुष्यातील घडामोडी सांगत असतो. यासाठी तो व्हिडीओ पोस्ट करत असतो. व्हिडीओत त्याच्या हातात काठी दिसते. 

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, टॉबीने सांगितलं आहे की, त्या दिवशी मी जीममध्ये नेहमीप्रमाणे व्यायाम करत होते. मी कधीही इतरांच्या गोष्टीत दखल देत नाही. पण याचवेळी मला एका महिलेचा आवाज ऐकू आला. ती मला म्हणत होती, 'ओह, तुला हे दृश्य फार चांगलं वाटत आहे का?' मला माझी नजर नेमक्या कोणत्या गोष्टीवर आहे याची कल्पना नव्हती. मी ज्या दिशेला तोंड करुन उभा आहे तिथे एक महिला व्यायाम करत असल्याची मला माहिती नव्हती. 

ब्रिटनमध्ये राहणारा टॉबी मानसशास्त्र आणि काऊंसलिंग विद्यार्थी आहे. त्याचं म्हणणं आहे की, "ती कशाबद्दल बोलत आहे हे मला समजलं नाही. तू माझ्याकडे एकटक का पाहत आहेस असं ती विचारत होती".

टॉबीने महिलेला आपण अंध असून पाहू शकत नाही असं सांगितलं. पण यानंतर महिलेने त्याची एक गोष्ट ऐकली नाही. महिलेने त्याला गप्प केलं आणि मॅनेजरला घेऊन आली. यानंतर मॅनेजरने टॉबीला जिममधून जाण्यास सांगितलं. त्याने म्हटलं आहे की, "जीममध्ये नीट न वागणाऱ्या काही मोजक्या लोकांमुळे काही महिलांना असुरक्षित वाटतं हे फार चिंतेची गोष्ट आहे".

"सध्याच्या जमान्यातही लोकांमद्ये दिव्यांगांसंबंधी फार जागरुकता नाही हे फार वाईट आहे. जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र होतात तेव्हा अशी स्थिती निर्माण होण्याची भीती असते, जी मी तुम्हाला सांगितली आहे," अशी खंत टॉबीने व्यक्त केली.