80 Kilo Python In Home Watch Horrifying Video: मलेशियामधील कामुंटिंगमधील कम्पुंग द्वॉ येथे एक फारच विचित्र घटना घडली आहे. धडकी भरवणाऱ्या या दुर्घटनेमध्ये एक भल्या मोठ्या आकाराचा अजगर छप्परावरुन चक्क एका घराच्या हॉलमध्ये पडला. हा अजगर पाच मिटरहून अधिक लांबीचा आहे. 80 किलोहून अधिक वजनाचा हा अजगर लिव्हिंग रुमचं छप्पर पाडून थेट सोफ्यावर पडल्याचं धक्कादायक व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
मलेशियातील 'न्यू स्ट्रेट्स टाइम्स' या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, शेजारच्या शेतामधून हा भल्या मोठ्या आकाराचा अजगर घराच्या छप्परावर आल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. पाम तेलासाठी येथे मोठ्याप्रमाणात पामची झाडं लावली जातात. त्याच बागेतून हा अजगर छप्परावर आला. एवढा मोठा अजगर छप्परावर असल्याचा अंदाज या कुटुंबाला आधीच आल्याने त्यांनी तायपींग जिल्ह्याच्या बचाव कक्षाला फोन करुन याबद्दल कळवलं होतं. 22 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास हा सारा प्रकार घडला आहे. एवढा मोठा अजगर छप्परावरुन घरात पडल्याचं समजताच हे बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. या तुकडीमध्ये सात जण घटनास्थळी आले, अशी माहिती बाचव कक्षाचे जिल्हा प्रमुख फैजुल्लाहालिमी मोहग युनीस यांनी दिली.
लिव्हिंग रुममध्ये पडलेला हा भलामोठा अजगर पकडण्यासाठी या तुकडीला लिव्हिंग रुमची एक भिंत फोडावी लागली. ब्रूट अमेरिका अकाऊंटवरुन या दुर्घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा भलामोठा अजगर छप्पर फाडून घरात पडल्यानंतर काय गोंधळ उडाला हे या व्हिडीओथ दिसत आहे. हा अजगर सोफ्यावर पडल्यानंतरही हलचाल करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
या अजगराला पकडून स्थानिक वनविभागाने त्याला राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडून दिलं. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी एवढा मोठा अजगर आपल्या घरात अशापद्धतीने पडला तर आपल्या जीवाचं धसका घेतल्यानेच काहीतरी बरं वाईट होईल असं म्हटलं आहे. एकाने सामान्यपणे ऑस्ट्रेलियात हे असे अजस्र प्राणी घरांमध्ये घुसखोरी करतात मात्र यंदा हा प्रकार वेगळ्या देशात घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. अनेकांनी अजगर छप्परावर असल्याची कल्पना या कुटुंबाल वेळीच आल्याने आणि सोफ्यावर कोणी बसलेलं नव्हतं म्हणून मोठा अनर्थ टळल्याबद्दल समधान व्यक्त केलं आहे.