Girl Orders From Moms Amazon Account: हल्ली लहान मुलांना विरंगुळा म्हणून किंवा महत्वाच्या कामादरम्यान त्यांचा त्रास नको म्हणून पालकांकडून त्यांना स्मार्टफोन दिला जातो. अनेक पालकांच्या मोबाईलमध्ये हल्ली मुलांसाठीचे विशेष अॅप्सही डाऊनलोड केलेले असतात. मात्र मुलांकडे मोबाईल दिला म्हणजे त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं असं नाही. असं केल्यास मोठं नुकसान होऊ शकतं. असाच काहीसा प्रकार अमेरिकेमध्ये घडला. येथील मॅसॅच्युसेट्समधील लीला वैरिस्को नावाच्या 5 वर्षाच्या मुलीने आपल्या आईच्या स्मार्टफोनवर खेळता खेळात चक्क लाखो रुपयांचं सामना मागवलं.
लीलाच्या आईच्या मोबाईलवरील अॅमेझॉनचं अॅप (amazon account) ओपन होतं. या अॅपवर जाऊन लीलाने तब्बल 3 हजार अमेरिकी डॉलर्सचं सामना मागवलं. यामध्ये खेळण्यातील 10 मोटरसायकल, 10 जोड्या काऊ गर्ल शूजचा समावेश होता. यासंदर्भातील माहिती एनबीसी 10 ला लीलाची आई जेसिका नून्स यांनी दिली. "मी नेमक्या कोणत्या गोष्टी मागवल्या यासंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी मी माझ्या अॅमेझॉन ऑर्डरची हिस्ट्री तपासून पाहिली. त्यावेळेस 10 मोटरसायकल आणि 7 नंबरचे 10 जोड्या काऊ गर्ल शूज मागवल्याचं दिसून आलं," असं जेसिका यांनी सांगितलं. "खेळण्यातील बाइक आणि जीपची किंमत जवळजवळ 3180 डॉलर्स इतकी होती. शूजची किंमत 600 डॉलर्स इतकी होती," असंही या महिलेनं सांगितलं. लीलाने अगदी बाय नाऊ पर्यायही सिलेक्ट केला होता.
नून्स यांना मुलीने केलेल्या ऑर्डर्सपैकी शूजची आणि मोटरसायकल्सच्या अर्ध्या ऑर्डर रद्द करण्यात यश आलं. मात्र 5 मोटरसायकल आणि एक जीपची ऑर्डर त्यांना रद्द करता आली नाही. लीलाने हे कसं केलं याबद्दल बोलताना नून्सने सीएनएनच्या सहय्योगी डब्ल्यूजेएआरला दिलेल्या माहितीनुसार, "तिने काही गोष्टी रॅण्डमली सिलेक्ट केल्या आणि नंतर बाय नाऊ क्लिक केलं. ही ऑर्डर करण्यात आल्याचं उशीरा लक्षात आलं."
नून्स यांनी लीलाला यासाठी शिक्षा देण्याऐवजी यामधून तिने शिकलं पाहिजे या हेतूने तिला नेमकं तिने काय केलं हे समजावून सांगितलं. तसेच तिला हे समजावून सांगितलं तर ती पुन्हा करणार नाही, असंही नून्सने म्हटलं आहे. या प्रकरणावरुन इतर पालकांनीही धडा घेणं आवश्यक आहे. मुलांना मोबाईल देताना ज्या अॅपवरुन व्यवहार केला जातात ते किमान लॉक केले पाहिजेत. अथवा आर्थिक व्यवहारासंदर्भातील अॅपमधून लॉग आऊट केल्यानंतरच मुलांच्या हाती मोबाईल दिला पाहिजे. अनेकदा अशा प्रकरणांमध्ये मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यताही असते.