धक्कादायक! 3 दिवस लिफ्टमध्ये अडकून पडलेल्या 32 वर्षीय महिलेचा मृत्यू

Woman Stuck In Lift For 3 Days: दैनंदिन दिनक्रमाप्रमाणे ही महिला सायंकाळी ऑफिसमधून घरी आली नाही. त्यानंतर तिच्या घरच्यांनी तिचा शोध घेतला. मात्र नंतर त्यांनी ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आणि तिचा शोध सुरु झाला. शोध संपला तेव्हा सर्वांना धक्काच बसला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 2, 2023, 03:50 PM IST
धक्कादायक! 3 दिवस लिफ्टमध्ये अडकून पडलेल्या 32 वर्षीय महिलेचा मृत्यू title=
ही महिला 3 दिवस लिफ्टमध्ये अडकून होती (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - रॉयटर्स)

Woman Stuck In Lift For 3 Days: उझबेगिस्तानमधील ताश्कंद येथे एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. येथील एक महिला तब्बल 3 दिवस एका लिफ्टमध्ये अडकून पडली होती. या विचित्र दुर्घटनेमध्ये 32 वर्षीय महिलाचा मृत्यू झाला आहे. 3 दिवस या महिलेला वाचवण्यासाठी कोणीही आलं नाही. ज्यावेळेस ही लिफ्ट उघडली तेव्हा आतमध्ये या महिलेचा मृतदेह आढळून आलं. 

तिचा आवाजच ऐकू आला नाही

समोर आलेल्या माहितीनुसार मरण पावलेल्या माहिलेचं नाव ओल्गा लियोंटीवा असं आहे. लियोंटीवा 9 मजल्याच्या इमारतीमध्ये नवव्या मजल्यावर अडकून पडली होती. तिने मदतीसाठी बराच आरडाओरड केला मात्र तिच्या मदतीला कोणीही आलं नाही. या महिलेचा आवाज लिफ्टच्या बाहेर ऐकू येत नव्हता असं सांगितलं जात आहे. लियोंटीवा ही येथील पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत होती.

इमारतीच्या लिफ्टमध्येच मृतदेह

दैनंदिन दिनक्रमाप्रमाणे सायंकाळी लियोंटीवा ऑफिसमधून घरी यायची. मात्र ती 24 जुलै रोजी घरी आली नाही. त्यामुळेच तिच्या घरच्यांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर या महिलेचा शोध सुरु केला. मात्र बराच शोध घेतल्यानंतर 3 दिवसांनी तिचा मृतदेह ती राहत असलेल्या इमारतीच्या लिफ्टमध्येच आढळून आला. लियोंटीवाला एक 6 वर्षांची मुलगी आहे. सध्या या मुलीचा ताबा नातेवाईकांना देण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे.

चिनी कंपनीची लिफ्ट

समोर आलेल्या माहितीनुसार, लियोंटीवा ज्या लिफ्टमध्ये अडकली ती लिफ्ट चिनी कंपनीची होती. ही लिफ्ट चालू स्थितीमध्ये होती. मात्र या लिफ्टची नियमांप्रमाणे नोंदणी करण्यात आली नव्हती. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी या भागामध्ये वीजपुरवठा खंडित झालेला नव्हता असं येथील स्थानिक वीजपुरवठा कंपनीने स्पष्ट केलं आहे. या इमारतीमधील नागरिकांनी नोंदवल्या जबाबानुसार सदर घटना ही लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानेच घडल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 

मागील आठवड्यामध्ये इटलीमध्येही अशीच घटना घडली होती. पालेर्मो येथील 61 वर्षीय फ्रांसेस्का मार्चियोन नावाची महिला लिफ्टमध्ये असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने तिचा मृत्यू झाला होता. या महिलेची सुटका करण्यासाठी करण्यासाठी आपत्कालीन सेवांना पाचारण करण्यात आलं. मात्र लिफ्टमध्ये या महिलेचा मृतदेह सापडला. ही लिफ्ट 2 मजल्यांच्यादरम्यान अडकली होती. लिफ्टचे दरवाजे उघडे होते. मात्र घाबरल्याने या महिलेचा मृत्यू झाला असावा असं अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचाही तपास सध्या सुरु आहे.