मुंबईसह देशातील 11 शहरं पाण्याखाली बुडणार, NASA IPCC चा धक्कादायक अहवाल

नासाच्या अहवालातून मोठा इशारा, या कारणामुळे बुडणार 11 शहरं, पाहा काय आहे रिपोर्टमध्ये 

Updated: Aug 10, 2021, 05:55 PM IST
 मुंबईसह देशातील 11 शहरं पाण्याखाली बुडणार, NASA IPCC चा धक्कादायक अहवाल title=

नवी दिल्ली: देशात अनेक ठिकाणी आधी महापुराने अनेक गावं आणि शहरं उद्ध्वस्त केली आहेत. त्यामध्ये आता चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. येत्या काळात मुंबईसह 11 शहरं पाण्यात बुडतील असा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार मुंबईसह आणखी काही शहरं ही 3 फूट पाण्याखाली जातील असं सांगण्यात आलं आहे. इतकच नाही तर समुद्र-नद्यांजवळ असणाऱ्या जमिनीचं क्षेत्रफळ कमी होईल असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 

अमेरिकन अंतराळ संस्था नासाने सी लेव्हल प्रोजेक्शन टूल तयार केलं. जेणेकरून लोकांचे जीवन आणि मालमत्ता समुद्र किनाऱ्यांवर येणाऱ्या आपत्तीपासून वेळेत सुरक्षित राहू शकेल. या ऑनलाईन साधनाद्वारे, भविष्यातील आपत्तीची स्थिती म्हणजे समुद्राची वाढती पातळी जाणून घेता येईल. हे साधन जगातील सर्व देशांची समुद्र पातळी मोजू शकते.

नासा इंटरगवर्नमेंटल पॅनल ऑन क्लाइमेट चेंजच्या अहवालानुसार काही शहर समुद्रात बुडून जातील असा इशारा देण्यात आला आहे. IPCCच्या सहाव्या एसेसमेंट अहवाल 9 ऑगस्टला प्रकाशित करण्यात आला. त्यामध्ये वारा आणि पाणी या दोघांची स्थिती आणि त्यात होणारे बदल यावर आधारीत होता. 

IPCC जगभरातील पर्यावरणाच्या स्थितीचा रिपोर्ट देते मात्र यावेळी आलेला रिपोर्ट खूपच भयंकर आणि सतर्क करणारा आहे. त्यामुळे चिंताही वाढली आहे. या रिपोर्टनुसार 2100 जगाचं तापमान खूप जास्त वाढणार आहे. भविष्यात लोकांना थंडी नाही तर उष्णतेचा खूप जास्त सामना करावा लागू शकतो. 

कार्बनचं उत्सर्जन आणि प्रदूषणावर जर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही तर 4.4 डिग्रीपर्यंत तापमान वाढू शकतं. पुढच्या दशकात 1.5 डिग्री सेल्सियसने तापमान वाढणार असल्याचा अंदाज नासाच्या रिपोर्टमधून समोर आला आहे. 

अहवालानुसार, साधारण 80 वर्षांनंतर म्हणजेच 2100 सालापर्यंत भारतातील 12 किनारपट्टीची शहरे समुद्र पातळी वाढल्यामुळे सुमारे 3 फूट पाण्यात जातील असा अंदाज आहे. म्हणजेच ओखा, मोरमुगाओ, कांडला, भावनगर, मुंबई, मंग्लोर, चेन्नई, तुतीकोरन आणि कोची, पारादीप यांना धोका आहे. 

अशा परिस्थितीचा विचार करून किनारपट्टी भागात राहणाऱ्या लोकांना भविष्यात सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणं गरजेचं ठरणार आहे. पश्चिम बंगालमधील किद्रोपोर क्षेत्र जिथे गेल्या वर्षीपर्यंत समुद्र पातळी वाढण्याचा कोणताही धोका नव्हता. तेथेही 2100 सालापर्यंत अर्धा फूट पाणी वाढेल असं सांगण्यात आलं आहे. 

नासाच्या अहवालानुसार अनेक ठिकाणी जमीन पाण्याखाली गेल्यानं क्षेत्रफळही कमी होईल. याचं कारण म्हणजे समुद्राची पातळी वाढणार आहे. याआधी काही बेटं पाण्याखाली गेल्याच्याही बातम्या आहेत. त्यामुळे सतर्क राहाण्याचा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वी पर्यावरणात जे बदल 100 वर्षात दिसत होतं ते आता 20 ते 10 वर्षांवर आलं आहे. त्यामुळे ही चिंतेची बाब असल्याचं म्हटलं आहे.