नवी दिल्ली : कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतो आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 30 हजारांहून अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण होण्याचा धोका लहान मुलं आणि वृद्धांमध्ये अधिक असल्याचं सांगितलं जातंय. परंतु कोरोनाची लागण झालेल्या 101 वर्षीय वृद्धाने कोरोनावर यशस्वी मात केल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.
इटलीमध्ये कोरोनाची लागण झालेल्या 101 वर्षीय वृद्ध व्यक्तीला गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. वृद्धांमध्ये कोरोनाचा धोका अधिक असतानाही अशाप्रकारे कोरोनावर यशस्वी मात करणारे, ते सर्वात वृद्ध व्यक्ती ठरले आहेत.
इटालियन माध्यमांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 101 वर्षीय Mr. पी, यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांनी चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात त्यांना रिमिनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी संध्याकाळी योग्य त्या उपचारानंतर, ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचं रिमीनी रुग्णालयाच्या ग्लोरिया लिसी यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितलं.
1919 मध्ये जन्म झालेल्या Mr. पी. यांनी दुसऱ्यांदा साथीच्या आजारावर मात केल्याचं लिसी यांनी सांगितलं. गुरुवारी एका दिवसांत येथे कोरोना व्हायरसच्या 1,189 नवीन प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती आहे.
इटलीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अहवालानुसार, देशात 70 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या जवळजवळ 80 टक्के रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे.