निनाद झारे, मुंबई : भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी होऊ घातलेल्या क्वाड शिखर परिषदेत भारतासाठी दोन गुड न्यूज येण्याची शक्यता आहे. भारत जगाच्या लस उत्पादनाचं केंद्र बनणार आहे. त्यासाठी अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन स्वतः पुढाकार घेणार असून जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लसीचं उत्पादन भारतात करण्यासंदर्भातील सुतोवाच होण्याची शक्यता आहे. याशिवाय जगासाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या तब्बल १ अब्ज कोरोना लसींचं उत्पादन भारतातच करण्याचं लक्ष्य या परिषदेच्या निमित्तानं ठेवलं जाणार असल्याचं व्हाईट हाऊसनं म्हटलं आहे.
व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन चीनच्या आक्रमतेला पर्याय उभा करण्याबाबत कुठलाही आड पडदा न ठेवता बोलणार आहेत. आज संध्याकाळी सात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पतंप्रधान स्कॉट मॉरीसन, जपानचे पंतप्रधान सुगा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन ऑनलाईन शिखर परिषदेत सामील होणार आहेत.
सुमारे ९० मिनिटांच्या या बैठकीत चीनच्या दक्षिण चीन समुद्रातली वाढती आक्रमकता, भारत-चीन सीमेवर वाढता तणाव, याविषयावर खुल्या दिलानं चर्चा होणार असल्याचं व्हाईट हाऊसनं म्हटलं आहे.