प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : दृष्टीहीन महिलांच्या आयुष्यात रंग भरण्याचं काम रायगडमधलं अॅक्टिव्हिटी सेंटर करतंय. आतापर्यंत या संस्थेनं अनेक अंध महिलांना स्वयंपूर्ण केलं आहे.
अलिबाग तालुक्यातल्या आरसीएफ वसाहतीतलं हे रायगड अॅक्टीव्हिटी सेंटर. इथे काम करणा-या सगळ्या महिला अंध आहेत.
नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेच्या माध्यमातून गेली 15 वर्षं हे केंद्र अंध महिलांच्या जीवनात वेगवेगळे रंग भरण्याचं काम करतंय. इथे अंध महिलांना स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत केली जाते.
कागदाची फुलं, मेणबत्त्या, पणत्या रंगवणं, इमिटेशन ज्वेलरी, पायपुसणी तयार करण्याचं प्रशिक्षण या महिलांना दिलं जातं. ज्या महिला या केंद्रात येऊ शकत नाहीत, अशा महिलांना त्यांच्या घरी जाऊन साहित्य पुरवलं जातं.
अलिबाग आणि मुरूड तालुक्यातल्या जवळपास नव्वदहून अधिक महिला या केंद्राचा लाभ घेतायत. अंध महिलांनी तयार केलेल्या या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याचं कामही ही संस्था करते. त्यामधून या महिलांना रोजगार मिळतो.
अंध महिलांसाठी ही संस्था आशेचा किरण आहे. अशा महिलांना स्वावलंबी, स्वयंपूर्ण करण्याचं चांगलं काम ही संस्था करतेय.