कोल्हापूर: कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील संशयीत आरोपी अमोल काळेला गुरुवारी कोल्हापूर सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अमोल काळेकडून एक डायरी जप्त करण्यात आली. या डायरीत सांकेतिक भाषेचा वापर झाला आहे. या सांकेतिक भाषेचा अर्थ लावण्यासाठी कोठडीची गरज असल्याचे वकिलांनी म्हटले.
अमोलने कट कुठे रचला, तो कोणाच्या संपर्कात होता, कुठे वास्तव्याला होता, याबद्दल महत्त्वाचे दुवे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्या अनुषंगाने पोलीस अमोलच्या कोल्हापूरातील सहकाऱ्यांचा शोध घेत आहेत.
अमोल काळेने पानसरे यांच्या हत्येसाठी शस्त्र पुरवल्याचा संशय आहे. बुधवारी संध्याकाळी महाराष्ट्र एटीएसने कर्नाटक एटीएसकडून अमोल काळेचा ताबा घेतला होता. अमोल काळे हा पत्रकार गौरी लंकेश प्रकरण आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला संशयित आहे.
अमोल काळेकडून जप्त झालेल्या डायरीत महत्त्वाची माहिती असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलंय. या सांकेतिक भाषेतल्या माहितीचा अर्थ लावण्याचे काम पोलीस करत आहेत.
या अनुषंगाने त्याची चौकशी करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले. काळेच्या चौकशीतून कॉम्रेड पानसरे हत्येबाबत महत्त्वाचा उलगडा होण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.