भारतीय लष्कराला मोठा धक्का; गोपनीय क्षेपणास्त्र प्रकल्पात हेरगिरी

निशांत अग्रवाल ब्राह्मोस क्षेपणास्त्राशी संबंधित चमूमध्ये काम करत होता.

Updated: Oct 8, 2018, 03:40 PM IST
भारतीय लष्कराला मोठा धक्का; गोपनीय क्षेपणास्त्र प्रकल्पात हेरगिरी title=

नागपूर: भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) संस्थेतील एका अधिकाऱ्याला हेरगिरीच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे. लष्कराची गुप्तचर यंत्रणा आणि उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाकडून संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली. 

या संशयित व्यक्तीचे नाव निशांत अग्रवाल असे असून तो नागपूर येथे डीआरडीओच्या अतिमहत्त्वाच्या ब्राह्मोस प्रकल्पात काम करत होता. सूत्रांच्या माहितीनुसार, अधिकृत गोपनीयता कायद्याखाली ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. 

निशांत अग्रवाल ब्राह्मोस क्षेपणास्त्राशी संबंधित चमूमध्ये काम करत होता. नागपूरच्या उज्ज्वल नगरमधील मनोहर काळे यांच्या घरी तो भाड्याने राहत होता. यापूर्वी तो डीआरडीओच्या हैदराबाद येथील विभागात कार्यरत होता. 

निशांतने येथील गुप्त माहिती आयएसआय आणि अमेरिकन गुप्तचर विभागाला पुरविल्याचा संशय गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरु असून लवकरच यासंबंधीची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. निशांतला २०१७ - १८ चा यंग सायंटिस्ट अॅवॉर्डने गौवरविण्यात आले होते.