Maharashtra Weather News : इथं राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असतानाच हवामानाचेही काहीसे असेच तालरंग पाहायला मिळत आहेत. कोकण किनारपट्टी भागामध्ये समुद्रावरूनही उष्ण वारे वाहणार असल्यामुळं सूर्याचा दाह अधिक जाणवणार आहे. तर, राज्याच्या उर्वरित भागामध्येही उकाडा अडचणी वाढवचाना दिसणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार विदर्भात उष्ण रात्रींचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता वर्तवण्यासोबतच इथं ताशी 40-50 kmph वेगानं वारे वाहून हलका पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवला आहे. तर, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30-40 kmph वेगाे येण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/bmckoqtEFW— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 6, 2024
राज्यात पुढील 10 मे पर्यंत विदर्भ पट्ट्यामध्ये उष्ण वातावरण कायम राहणार असून, सध्याच्या घडीला सोलापूर आणि अकोल्यामध्ये सर्वाधिक 44.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असून, लातूर आणि नांदेडमध्ये गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे, प्राथमिक स्तरावर या भागांमध्ये अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सध्याच्या घडीला तामिळनाडूच्या दक्षिणेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्या कारणानं मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, 10 मे पर्यंत जळगाव, सोलापूर, अहमदनगर आणि पुण्यातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इथं मुंबई आणि उपनगरांमध्ये पहाटेच्या वेळी तापमानात काही अंशांची घट होत असली तरीही दुपारच्या वेळी मात्र सूर्याचा दाह वाढत जाणार असून, सायंकाळीही तापमानात अपेक्षित घट नोंदवली जाणार नाही याची नोंद घ्यावी.