Interesting Facts : विमान प्रवास हा पहिलावहिला असो किंवा मग अगदी सराईताप्रमाणं नेहमीच्या नेहमी केला जाणारा असो. तो कायमच खास असतो. प्रवासाला निघण्यापासून ते अगदी विमानात बसेपर्यंत, या प्रवासात बऱ्याच गोष्टी घडत असतात. अशा या विमानप्रवासात कायमच काही गोष्टी लक्ष वेधून जातात. बरं, या विमानप्रवासात खिडकीजवळ बसण्याची संधी मिळाली, तर मिळणारा आनंदही काही औरच असतो.
विमानाच्या खिडकीतून बाहेरच्या बाजूला दिसणारे आणि वाऱ्याहूनही अधिक वेगानं मागे जाणारे ढग, सूर्योदय किंवा सूर्यास्त आणि मुंगीहूनही लहान आकाराची दिसणारी शहरं हे असं काहीसं चित्र या प्रवासादरम्याम पाहायला मिळतं. खिडकीपाशी असणारी सीट मिळाल्यानंतर जर ही सीट विमानाच्या इंजिनापाशी असेल तर तिथं अशा काही गोष्टी पाहता येतात ज्या भारावून सोडतात.
विमानानं उड्डाण भरलं की त्याच्या पंखांची रचना, त्यावर असणारे लहान पंखे यांच्यामध्ये काही बदल होताना दिसतात. पंखे अमुक एका दिशेनं झुकल्याचंही यावेळी पाहायला मिळतं. इंजिनावर असणारे हे लहानसे पंथे नेमके काय फायद्याचे असतात माहितीये? ते बहुतेक वेळा खालच्या दिशेनं का झुकलेले असतात माहितीये?
विमानाच्या / कोणत्याही कमर्शिअल फ्लाईटच्या इंजिनाच्या किनाऱ्याशी हे लहानसे पंख असतात. यांना नॅकेले चाईन्स किंवा नॅकेले स्ट्रेक्स असं म्हणतात. हे पंख जाणीवपूर्वक डेल्टा आकाराचे तयार केले जातात. हे स्ट्रेक्स एअरफ्लो अर्थात हवेचा झोत नियंत्रित करतात, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये हे पंख अजिबात हलत नाहीत.
तज्ज्ञांच्या मते जेव्हा विमान उड्डाण घेतं तेव्हा ते जागीच फिरतं किंवा थेट हवेत झेपावतं. त्यावेळी विमानाचं इंजिन हवेच्या प्रवाहाला थांबवून वेगळं करु पाहतं. यामुळं दबावक्षेत्र तयार होतं आणि विमान थांबण्याची भीती असते. हेच दबावक्षेत्र कमी करण्यासाठी लहानसे पंखे बसवण्यात आलेले असतात. ज्यामुळं हवेचा प्रवास या पंखांपर्यंतच येतो आणि विमान एका ठराविक उंचीवर पोहोचल्यास हेच पंख हवेचा दाब नियंत्रीत करून विमानही नियंत्रणात ठेवण्याचं महत्त्वाचं काम करतात.
जवळपास सर्वच विमानांवर नॅकेल स्ट्रॅक्स लावण्यात येतात. एयरबस ए 320 आणि बोइंग 737 सारख्या नॅरोबॉडीपासून बोईंग 777 आणि 787 या विमानांमध्येही हे लहान पंख असतात. काही विमानांमध्ये दोन्ही एका इंजिनाच्या दोन्ही बाजूला स्ट्रेक असतात. थोडक्यात हे लहानसे पंख विमान नियंत्रित ठेवण्यात मोठी भूमिका बजावताना दिसतात, हे लक्षात राहूद्या.