Video: ..म्हणून तो हेल्मेट घालून चालवतो स्वत:ची Audi; कारण देत म्हणाला, 'मी हेल्मेट न..'

Man Drives Car With Helmet: या व्यक्तीनेच तो असं का करतो यासंदर्भातील सविस्तर माहिती दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला काही दिवसांमध्ये 1.6 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 23, 2024, 03:38 PM IST
Video: ..म्हणून तो हेल्मेट घालून चालवतो स्वत:ची Audi; कारण देत म्हणाला, 'मी हेल्मेट न..' title=
या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Man Drives Car With Helmet: उत्तर प्रदेशमधील एक व्यक्ती चक्क हेल्मेट घालून आपली चारचाकी आलिशान गाडी चालवतो. आता तुम्हाला वाटत असेल की या व्यक्तीला वेगाची भीती वगैरे वाटते. मात्र असं काहीही नसून या व्यक्तीला त्याची ऑडी गाडी हेल्मेट घालून चालवण्यामागील कारण आहे उत्तर प्रदेश वाहतूक पोलिसांनी ठोठावलेला 1 हजार रुपयांचा दंड! चारचाकी गाडी चालवताना हेल्मेट घालतं नाही म्हणून या व्यक्तीला 1 हजारांचा दंड ठोठावण्यात आल्यापासून ही व्यक्ती हेल्मेट घालूनच आपली ऑडी कार चालवते.

मेसेज आला अन्...

हेल्मेट घालून चारचाकी चालवणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे बहादूर सिंह परिहार! बहादूर सिंह हे येथील स्थानिक ट्रक युनियनचे प्रमुख आहे. त्यांना एकदा अचानक त्यांच्या मोबाईल स्थानिक वाहतूक पोलिसांकडून तुम्हाला दंड ठोठावण्यात आला आहे असा मेसेज आला. बहादूर सिंह यांनी परिवाहन विभागाची वेबसाईट तपासून पाहिली असता, तुम्ही दुचाकी चालवताना हेल्मेट घालतं नव्हतं म्हणून तुम्हाला दंड ठोठावला जात आहे. मात्र जेव्हा हे चलान कापण्यात आलं तेव्हा आपण ऑडी कार चालवत होतो असं बहादूर सिंह यांचं म्हणणं आहे.

चलानमध्येच गोंधळ

डिजीटल चलानसोबत एका दुचाकीचा फोटो देण्यात आला आहे. मात्र चलानमधील तपशीलावर ज्या वाहनाने नियमाचं उल्लंघन केलं ते वाहन 'मोटर कार' आहे असं नमूद केलं आहे. त्यामुळे पोलिसांनीच चलान कापताना गोंधळ घातल्याचं स्पष्ट होत आहे. बहादूर यांनी वाहतूक पोलिसांशी संपर्क साधून नेमका काय गोंधळ झाला आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस बहादूर यांना लोकसभा निवडणूक संपल्यानंतर या प्रकरणावर विचार करु असं सांगण्यात आलं. 

मी हेल्मेट न घालता कार चालवल्याने..

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडीओमध्ये बहादूर यांनी, "मी हेल्मेट न घालता कार चालवत होतो म्हणून माझं चलान कापण्यात आलं. आता मी हेल्मेट घालून कार चालवतो. मात्र यानंतरही माझं चलान कापलं तर काय?" असा प्रश्न उपस्थित केला आहे.

अनेकांनी नोंदवलं मत

या व्हिडीओला 1.6 मिलियन व्ह्यूज आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एफवन चालकही हेल्मेट घालून कार चालवतात, असं एकाने म्हटलं आहे. दुसऱ्याने तुमच्या नावावर चुकीचं चलान कापण्यात आलं तर तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार करु शकता. ऑनलानही ही तक्रार करता येते, अशी माहिती बहादूर यांना दिली आहे. स्थानिक पोलिसांना तपासानंतर तुम्हाला चुकीच्या पद्धतीने दंड ठोठावण्यात आल्याचं लक्षात आलं तर ते हे चलान रद्द करतात. अशावेळेस एक पैसाही दंड भरावा लागत नाही, अशी माहिती या व्यक्तीने दिली.