वही-पुस्तकाप्रमाणे घडी घालता येणारा सॅमसंगचा गॅलेक्सी फोल्ड लॉन्च

 वही-पुस्तकाप्रमाणे घडी घालता येईल असा फोन सॅमसंग कंपनीने लॉन्च केला आहे.  

Updated: Feb 23, 2019, 11:44 AM IST
वही-पुस्तकाप्रमाणे घडी घालता येणारा सॅमसंगचा गॅलेक्सी फोल्ड लॉन्च  title=

मुंबई : मोबाईलच्या जगात वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहे. अनेक मोबाईल कंपन्या कमी किंमतीत जास्तीत जास्त फिचर्स देत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल कंपन्यांची स्पर्धा सुरू आहे. यात आता सॅमसंगने नवा प्रयोग केला आहे. ज्या फोन बद्दल आपण फक्त गप्पा मारू शकतो असा फोन या कंपनीने प्रत्यक्षात आणला आहे. वही-पुस्तकाप्रमाणे घडी घालता येईल असा फोन सॅमसंग कंपनीने लॉन्च केला आहे.  सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड असे याचे नाव असून तो अॅपलशी स्पर्धा करणारा फोन असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अॅपलचा ग्राहक आता सॅमसंगकडे वळला तर आश्चर्य मानायला नको.

जगातला पहिलाच फोन

घडी घातल्यानंतर हा फोन सामान्य स्मार्टफोनप्रमाणे दिसतो. घडी घातल्यावर हा फोन ४.६ इंच इतक्या आकाराचा मोबाईल म्हणून वापरता येतो. तर घडी उघडल्यानंतर हा फोन एखाद्या टॅबप्रमाणे दिसतो. घडी उघडल्यावर या फोनचा डिस्प्ले ७.३ इंच इतका मोठा असतो. या टॅबमध्ये एकाच वेळी तीन अॅप्स वापरु शकतो. घडी घालून ठेवता मोबाईलप्रमाणे ठेवता येणारा हा जगातला पहिलाच फोन असल्याचा सॅमसंगचा दावा आहे.

फिचर्स 

या फोनमध्ये तब्बल सहा कॅमेरे आहेत. शिवाय १२ जीबी रॅम आणि ५२१ जीबी स्टोरेज क्षमता या मोबाईलमध्ये आहे. या फोल्ड फोनची किंमत १ हजार ९८० डॉलर्स अर्थात सुमारे १ लाख ४१ हजार इतकी असल्याचं बोललं जातंय. २६ एप्रिलपासून या फोल्ड फोनचं प्री-बुकिंग सुरु होणार आहे.