का होतो मोबाईलचा स्फोट? कशी काळजी घ्याल?

मोबाईलवर गेम खेळत असताना ८ वर्षांच्या प्रशांत जाधवची ३ बोटं तुटली आहेत.

Updated: Feb 10, 2019, 08:32 PM IST
का होतो मोबाईलचा स्फोट? कशी काळजी घ्याल? title=

मुंबई : नांदेडच्या मुखेड तालुक्यातल्या कमलातांडा इकडे धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईलवर गेम खेळत असताना ८ वर्षांच्या प्रशांत जाधवची ३ बोटं तुटली आहेत. आयकॉल के-७२ असं या मोबाईलचं नाव आहे. महिन्याभरापूर्वीच श्रीपाद जाधव यांनी जाहिरात पाहून कंपनीशी संपर्क साधून हा मोबाईल मागवला होता. या मोबाईलच्या जाहिरातीप्रमाणे दीड हजार रुपयाला ३ मोबाईल आणि १ घड्याळ अशी ऑफर असल्यामुळे जाधव यांनी हा मोबाईल मागवला होता.

का होतो मोबाईलचा स्फोट?

मोबाईलचा स्फोट का होतो याची कारणं जाणून घेण्यासाठी झी २४ तासनं इलेक्ट्रॉनिक तज्ज्ञ अंकुर पुराणिक यांच्याशी संपर्क साधला. 'मोबाईलमध्ये लिथियम आयर्न किंवा लिथियम पॉलिमर अशा दोन प्रकारच्या बॅटरी वापरल्या जातात. सरकारनं मोबाईल फोनसाठी आता बीआयएस मान्यता अनिवार्य केली आहे. यामुळे आता सरकारी प्रयोगशाळेमध्ये मोबाईल आणि बॅटरी यांची टेस्ट होते. जी प्रयोगशाळा आयएसआय मार्क देतं त्या प्रयोगशाळेत या मोबाईल आणि बॅटरीची टेस्ट होते.'

'तुमचा मोबाईल हा बीआयएस सर्टिफाईड मोबाईल असावा. बाजारात स्वस्त मिळणारे बहुतेक मोबाईल हे जुने मोबाईल दुरुस्त करून विकले जातात किंवा चायनीज हलक्या दर्जाचे मोबाईल असतात. या मोबाईलमधल्या बॅटरीदेखील त्याच दर्जाच्या असतात. लिथियम पॉलिमर आणि लिथियम आयर्न या बॅटरींमध्ये प्रचंड पॉवरचा साठा असतो. ही पॉवर एखाद्या फटाक्यासारखी असते. या पॉवरला व्यवस्थितपणे हाताळता आलं नाही किंवा या बॅटरीतून बाहेर येणारा करंट व्यवस्थितपणे हातळला गेला नाही, तर ही बॅटरी बॉम्ब होऊ शकते', असं अंकुर पुराणिक यांनी सांगितलं.

कशी काळजी घ्याल?

अशा घटनांपासून कशी काळजी घेण्यात येऊ शकते, याची माहितीही अंकुर पुराणिक यांनी दिली. 'मोबाईलचा जो चार्जर आहे तोच वापरावा. कमी दर्जाचा चार्जर वापरू नका. तसंच बॅटरी बिघडली असेल, तर ओरिजनल बॅटरीच विकत घ्या. लहान मुलांना मोबाईल हाताळायला देऊ नका. गेम खेळत असताना मोबाईल अतिशय तापतो, त्यामुळे मोबाईल तापल्यावर बाजूला ठेवा. ६० अंशाच्या वरती मोबाईलचं तापमान गेलं तर मोबाईलमधली लिथियम बॅटरी आग पकडण्याची शक्यता वाढते आणि ही बॅटरी बॉम्बसारखी फुटून दुर्घटना होऊ शकते'.

मोबाईलवर गेम खेळताना स्फोट, चिमुकल्याची ३ बोटं तुटली