अनुराग शाह, झी मीडिया, मुंबई : आता तुम्ही गाडी कशी चालवता आणि किती चालवता यावर तुमच्या गाडीच्या विम्याचा प्रिमियम निश्चित होणार आहे. गाडी चालवण्याचं प्रमाण आणि पद्धतीनुसार प्रिमियम बदलेल आणि तुमचे पैसे वाचतील. विमा कंपन्यांचं नियंत्रण करणाऱ्या IRDAIनं याबाबत मोठी घोषणा केलीये.
ड्रायव्हिंग चांगलं असेल तर तुमचा गाडीच्या विम्याचा हप्ता कमी होईल. मात्र रॅश ड्रायव्हिंग करत असाल, तर तुमचा हप्ता जास्त असेल. तुमचं ड्रायव्हिंग कमी असेल, तरीही तुमचा प्रिमियम कमी असेल. विशेष म्हणजे तुम्हाला एकापेक्षा जास्त दुचाकी किंवा चारचाकी गाड्या एकाच पॉलिसीमध्ये कव्हर करता येतील.
IRDAIनं विमा कंपन्यांसाठी सर्क्युलर काढलं असून याची तातडीनं अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेत. एखाद्याचं ड्रायव्हिंग नेमकं कसं आहे, हे कंपन्यांना समजावं यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे.
मोबाईल अॅपच्या मदतीनं कंपन्या ड्रायव्हिंगवर वॉच ठेवतील. गाडीवर एक छोटं डिव्हाईसही लावता येऊ शकतं. जीपीएसच्या मदतीनं विमा कंपनीला ड्रायव्हिंग पॅटर्न समजेल
या निर्णयामुळे बेफाम गाडी चालवणाऱ्यांना जादा भुर्दंड लागेल आणि रस्ते अपघातांचं प्रमाण कमी होण्याची आशा निर्माण झालीये.