RCom च्या ग्राहकांना झटका, १ डिसेंबरपासून बंद होणार वॉईस कॉल सेवा

रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या ग्राहकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 4, 2017, 04:20 PM IST
RCom च्या ग्राहकांना झटका, १ डिसेंबरपासून बंद होणार वॉईस कॉल सेवा title=
File Photo

नवी दिल्ली : रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या ग्राहकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.

टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCom) एक डिसेंबरपासून आपली वॉईस कॉलिंगची सेवा बंद करणार आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सचे ग्राहक या वर्षाच्या शेवटपर्यंत इतर नेटवर्कवर पोर्ट करु शकतात.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने यासंबंधी कंपनीला आपली मंजुरी दिली आहे. सर्वच टेलिकॉम ऑपरेटर्सला निर्देश देत ट्रायने म्हटलं आहे की, रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड आपल्या ग्राहकांना ४जी सेवा पूरवणार आहे. १ डिसेंबर २०१७ पासून हा नियम लागू होणार आहे.

सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सला ट्रायने दिलेल्या सूचनेत म्हटलं आहे की, ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी आरकॉमने सांगितले की, "रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (RCL) आपल्या ग्राहकांसाठी केवळ ४जी डेटा सेवा उपलब्ध करुन देऊ शकतं. यामुळे आम्ही १ डिसेंबर २०१७ पासून आपल्या ग्राहकांना वॉईस कॉलिंगची सेवा देऊ शकणार नाही".

रिलायन्स कम्युनिकेशन्सने ट्रायला सांगितले की, ८ टेलिकॉम सर्कलमध्ये ४जी सेवा पूरवण्यात येणार आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, हरियाणा, उत्तर प्रदेश पूर्व आणि पश्चिम, केरळ या राज्यांचा समावेश आहे.

ग्राहकांना दिली माहिती

ट्रायच्या मते, आरकॉमने आपल्या ग्राहकांना वॉईस कॉलिंग सेवा बंद करण्यासंदर्भातील सूचना आधीच दिली आहे. आरकॉमला आपल्या ग्राहकांना इतर कुठल्याही टेलिकॉम कंपनीसोबत पोर्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि ट्रायने याला मंजुरीही दिली आहे.

तसेच सर्व टेलिकॉम कंपन्यांना ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत आरकॉम ग्राहकांच्या पोर्टेबलिटीच्या रिक्वेस्ट स्विकारण्यास ट्रायने सांगितले आहे.