लाँच होण्याआधीच 'या' इलेक्ट्रिक SUV चा धुमाकूळ, फक्त घोषणा होताच 16 हजार ग्राहकांनी केली बूक

Range Rover Electric SUV: रेंज रोव्हरची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही बाजारात दाखल होत आहे. ही एसयुव्ही लाँच होण्याआधीच जगभरातील लोकांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. जाणून घ्या या एसयुव्हीबद्दल सविस्तर माहिती.   

शिवराज यादव | Updated: Feb 8, 2024, 01:18 PM IST
लाँच होण्याआधीच 'या' इलेक्ट्रिक SUV चा धुमाकूळ, फक्त घोषणा होताच 16 हजार ग्राहकांनी केली बूक title=

Range Rover Electric SUV: जगभरात गेल्या काही काळापासून इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेलवरील अवलंबता तसंच भार कमी करण्याच्या हेतूने सुरु कऱण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे अनेक दिग्गज वाहन निर्माता कंपन्याही यामध्ये गुंतवणूक करत आहेत. यादरम्यान रेंज रोव्हरच्या पहिल्या इलेक्ट्रिक एसयुव्हीची सध्या ग्राहक प्रतिक्षा करत आहेत. रेंज रोव्हरची ही पहिली इलेक्ट्रिक कार असणार आहे. दरम्यान लाँच होण्याआधीच एसयुव्हीने मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. 

घोषणा होताच 16 हजार युनिट्सचं बुकिंग

मिळालेल्या माहितीनुसार, रेंज रोव्हरच्या आगामी इलेक्ट्रिक एसयुव्हीची घोषणा होताच 16 हजार युनिट्सची बुकिंग झाली आहे. हा आकडा जगभरातील आहे. म्हणजेच जगभरातील 16 हजार लोकांनी लाँच होण्याआधीच रेंज रोव्हर एसयुव्ही खरेदी करण्यात रस दाखवला आहे. 

कंपनीने गतवर्षी डिसेंबर महिन्यात या एसयुव्हीची प्री-बुकिंग सुरु केली होती. यावेळी त्याने नेमके किती ग्राहक रेंज रोव्हरची इलेक्ट्रिक एसयुव्ही खरेदी करण्यास उत्सुक असल्याचं जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. V8 पावरट्रेनयुक्त आणि 523Bhp असणारी ही एसयुव्ही वर्षाच्या अखेरपर्यंत बाजारात येईल अशी आशा आहे. कंपनी वर्षाअखेरपर्यंत ही एसयुव्ही लाँच करु शकते. 

कशी असेल ही एसयुव्ही?

रेंज रोव्हरची पहिली बॅटरी इलेक्ट्रिक एसयुव्ही सध्याच्या ICE मॉडेलवर आधारित असेल. जॅग्वार लँड रोव्हरचे प्रोडक्ट इंजिनिअर बॉस थॉमस मुलर यांनी दावा केला आहे की, "आतापर्यंतचं सर्व शांत आणि सर्वात रिफाइंड रेंज रोव्हर असेल".

एसयुव्हीचे जे फोटो समोर आले आहेत त्याच्या आधारे सांगायचं झालं तर, कंपनीने स्टायलिंग तसंच ठेवलं आहे. यामध्ये 800V आर्किटेक्चरचा वापर केला जाणार आहे, जे अल्ट्रा फास्ट चार्जिंगला सक्षम करेल. 

पॉवर आणि परफॉर्मन्स

या कारबद्दल तांत्रिक माहिती समोर आलेली नाही. पण कंपनीचं म्हणणं आहे की, ही एसयुव्ही आयसीई मॉडेलप्रमाणे प्रत्येक प्रकारच्या रस्त्यावर सहजपणे धावण्यास सक्षम असेल. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिक व्हर्जनही खडबडीत रस्त्यांवर पळवू शकता. याशिवाय या कारमध्ये अनेक लक्झऱी फिचर्स दिले जाणार आहेत. याची वेडिंग क्षमता 850 मिमी असेल, जे आयसीई व्हर्जनमध्ये मिळतं.