मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी सध्या नाराज आहेत. रिलायन्स जिओ आणि सेल्युलर ऑपरेटर ऑफ इंडिया(COAI)मध्ये सध्या वाद सुरु आहेत. यामुळे मुकेश अंबानींनी COAIला मानहानीची नोटीस पाठवली. यानंतर COAIनं माफी मागायला नकार दिला. माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया COAIचे डायरेक्टर राजन मॅथ्यूज यांनी दिली आहे.
इकोनॉमिक टाईम्सनं दिलेल्या बातमीनुसार बार्सिलोनामध्ये सुरु असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्येही जिओ आणि COAIमध्ये सुरु असलेल्या वादाचा मुद्दा समोर आला. जिओनं पाठवलेल्या नोटीसवर माफी मागणार नाही, असं राजन मॅथ्यूज म्हणाले. COAIचे जे मतभेद आहेत ते ट्रायशी आहेत कोणत्याही कंपनीशी नाहीत, असं स्पष्टीकरण राजन यांनी दिलं.
भारती एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया यांच्यासारख्या जुन्या ऑपरेटर्सच्या किंमतीवर जिओला फायदा पोहोचवण्यासाठी ट्रायनं नियमांमध्ये बदल केला, असा आरोप राजन मॅथ्यूज यांनी केला होता. या आरोपानंतर जिओनं COAIविरोधात मानहानीची नोटीस पाठवली. ४८ तासांमध्ये या नोटिसला COAIनं उत्तर द्यावं, असं सांगण्यात आलं.
मागच्या एक ते दीड वर्षामध्ये ट्रायनं बदललेल्या नियमांमुळे नव्या ऑपरेटर्सना फायदा झाल्याचा आरोप COAIनं केला होता. ट्रायच्या प्रिडेट्री प्राइजिंगमुळे सर्वाधिक वाद निर्माण झाला होता. ट्रायनं इंटर कनेक्टिक यूसेज चार्जला कमी करुन १४ पैसे प्रति मिनिट केला होता. जिकडे कॉल संपतो त्या कंपनीला ऑपरेटिंग कंपनी हा चार्ज देते. याचा फायदा जिओला झाल्याचा आरोप एअरटेल, व्होडाफोन आणि आयडियानं केला होता.