PUBG Mobileसाठी मुलाने खर्च केले तब्बल १६ लाख रुपये

मुलाच्या कुटुंबियांना बँक अकाऊंटच्या स्टेटमेंटद्वारे या घटनेबाबत माहिती मिळाली. 

Updated: Jul 4, 2020, 01:55 PM IST
PUBG Mobileसाठी मुलाने खर्च केले तब्बल १६ लाख रुपये title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संकट काळातही पबजी गेम सतत चर्चेत आहे. या गेमच्या महसूलातही सतत वाढ होत असल्याची माहिती सेंसर टॉवर एनालिस्टने दिली आहे. या गेमवर अनेकांकडून टीकाही करण्यात येत आहे. या गेममुळे विचित्र घटना घडल्याचंही अनेकदा समोर आलं. आता या गेममुळे घडलेली आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने पबजी गेमच्या ऍप खरेदीसाठी 16 लाख रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या रिपोर्टनुसार, पंजाबमध्ये राहणाऱ्या एका 17 ते 18 वर्षीय मुलाने पबजी गेमच्या ऍप खरेदीसाठी तब्बल 16 लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या मुलाने आपल्या आई-वडिलांचे 16 लाख रुपये या गेमसाठी खर्च केले आहेत. रिपोर्ट्सनुसार, या मुलाच्या वडिलांनी हे पैसे त्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी जमवले असल्याची माहिती मिळत आहे.

रिपोर्टनुसार, या मुलाने तीन बँक अकाऊंटचा वापर करुन, आपल्या पबजी मोबाईल (PUBG Mobile) अकाऊंटला अपग्रेड करण्यासाठी इतक्या मोठ्या रकमेचा वापर केल्याची माहिती मिळत आहे. या मुलाने त्याच्या वडिलांच्या पैशातून, इतर काही मित्रांनाही पबजी ऍप खरेदी करुन दिले असल्याचं बोललं जात आहे. या मुलाच्या कुटुंबियांना बँक अकाऊंटच्या स्टेटमेंटद्वारे या घटनेबाबत माहिती मिळाली. मात्र या घटनेची माहिती मिळेपर्यंत अकाऊंटमधून 16 लाख रुपये खर्च झाले होते.

मिळालेल्या रिपोर्टनुसार, या मुलाचे वडील सरकारी कर्मचारी असून त्यांचा वैद्यकीय खर्च असतो. हा मुलगा त्याच्या आईसोबत राहतो. तर त्याच्या वडिलांची पोस्टिंग दुसऱ्या ठिकाणी आहे. या मुलाने पबजीच्या ऍप खरेदीसाठी त्याच्या आईच्या मोबाईल फोनचा वापर केला. या गेमसंबंधी पैशांचा व्यवहार झाल्यानंतर हा मुलगा मोबाईलवर आलेले, पैसे डेबिड झाल्याचे मेसेज डिलीट करत होता. सतत मोबाईल फोनचा वापर करणारा आपला मुलगा, फोनचा इतका वापर ऑनलाईन अभ्यासासाठी, शिक्षणासाठी करत असल्याचं आई-वडिलांना वाटत होतं. 

या घटनेनंतर, पबजी गेममध्ये मुलाने वेळ घालवू नये म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला एका मोबाईल रिपेअर दुकानात कामासाठी ठेवलं आहे. 'मी त्याला आता केवळ घरी बसू देऊ शकत नाही. तसंच आता त्याच्या अभ्यासासाठीही त्याला मोबाईल फोन देण्यात येणार नाही, असं वडिलांनी सांगितलं आहे.