मुंबई : मोबाईल वापरणाऱ्यांना कंपन्यांकडून नको असलेले कॉल, एसएमएस याविषयी सरकारने गंभीर भूमिका घेतली आहे. याबाबतीत आता टेलिकॉम कंपन्यांनी नवीन नियम लागू केला आहे. पण यात मोबाईल वापरणाऱ्यांना ऑनलाईन व्यवहार करताना ओटीपी (OTP - one time password) मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत. बँकेचे तसेच ऑनलाईन खरेदी करण्याचे व्यवहार करताना ओटीपी येतो, तो काही मिनिटात वापरणे गरजेचे असते, सुरक्षेच्या कारणास्तव, तो ५ किंवा १० मिनिटानंतर वापरला तर उपयोग होत नाही.
आधारसाठी देखील तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येतो, कोव्हीड व्हॅक्सिनेशनसाठी रजिस्टर मोबाईलनंबरवर ओटीपी येतो, अशा ठिकाणी या नव्या नियमामुळे तांत्रिक बदल केल्याने एसएमएस जरा उशीरा मिळत असल्याने, ओटीपी हा कालबाह्य ठरतोय. ऑनलाईन व्यवहारांसाठी तो वेळेत येणं गरजेचं आहे.
टॉयने दिलेल्या बातमीनुसार, मोबाईल वापरणाऱ्यांना नको असलेले कॉल, मेसेजेस कंपन्यांकडून यायला नकोत, यासाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथोरिटी ऑफ इंडियाने (TRAI) ग्राहकांना नको असलेल्या कॉल -एसएमएसचा मनस्ताप नको म्हणून टेलिकॉम कंपन्यांना काही उपाय करण्यास सांगितले आहे. यात टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांचे रजिस्ट्रेशन आणि नवीन मानांकन यासाठी नवा नियम लागू करण्यास सांगितले आहे.
रिलायंस जिओ, वोडाफोन आयडिया, भारती एअरटेल यांनी रविवारी रात्रीपासून तांत्रिक दृष्ट्या हा बदल सुरु केला आहे.
टेलिफोन कंपन्यांनी ग्राहकांना नको असलेले कॉल , एसएमएस नको म्हणून जे तांत्रिक बदल केले, त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना अत्यावश्यक असणार OTP - one time password उशीरा यायला लागले आहेत. मोठ्या प्रमाणात या अडचणी आणि तक्रारी सोमवारपासून यायला सुरुवात झाली.
ही अडचण दूर करणे हे टेलिकॉम कंपन्यांचं काम आहे. यावर टेलिकॉम कंपन्यांनी म्हटलंय, यावर आमचं काम सुरु आहे आणि ही अडचण लवकरच दूर होईल आणि वेळेवर ग्राहकांना ओटीपी मिळण्यास सुरुवात होईल.
TRAI ने टेलिफोन कंपन्यांना नको असलेले कॉल्स आणि एसएमएस थांबवण्यासाठी, ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यास सांगितले होते. टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथोरिटी ऑफ इंडियाने (TRAI) ग्राहकांना नको असलेले कॉल्स आणि एसएमएस बाबतीत २०१८ साली नवीन नियम बनवले होते.