मुकेश अंबानी टेन्शनमध्ये! Jio टेलीकॉमने 30 दिवसांत 79 लाख ग्राहक गमावले

  मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओला जबरदस्त झटका बसला आहे. Jio टेलीकॉमने 30 दिवसांत 79 लाख ग्राहक गमावले आहेत.  

वनिता कांबळे | Updated: Dec 6, 2024, 07:57 PM IST
मुकेश अंबानी टेन्शनमध्ये! Jio टेलीकॉमने 30 दिवसांत 79 लाख ग्राहक गमावले  title=

Jio Looses Customer:  मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. स्वस्तात जादा डेटा देणाऱ्या जिओ कंपनीने युजर्सना वेड लावले. मात्र, जिओ ने डेटा पॅक महाग केल्यामुळे याचा जबरदस्त झटका कंपनीला बसला आहे. Jio टेलीकॉमने 30 दिवसांत 79 लाख ग्राहक गमावले आहेत. सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL चे युजर्स मात्र झपाट्याने वाढले आहेत. 

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI च्या आकडेवारीनुसार भारतातील खाजगी दूरसंचार कंपन्यांनी सप्टेंबर 2024 मध्ये एकूण 10 दशलक्ष म्हणजेच 1 कोटी ग्राहक गमावले आहेत. याचा सर्वात जास्त फटका रिलायन्स जिओला बसला आहे. जिओने 7.9 दशलक्ष ग्राहक गमावले आहेत. तर, भारती एअरटेलने 1.4 दशलक्ष ग्राहक गमावले आहेत. व्होडाफोन-आयडिया (VI) कंपनीने 1.5 दशलक्ष ग्राहक गमावले आहेत. खाजगी कपंन्या आपले ग्राहक गमावत असताना  दुसरीकडे बीएसएनएलला याचा मोठा फायदा झाला आहे.

जुलै ते ऑक्टोबर 2024 दरम्यान 5.5 दशलक्ष म्हणजेच 55 लाख नवीन युजर्सनी  BSNL ची सेवा घेतली आहे. दूरसंचार विभाग अर्थात DoT च्या आकडेवारीनुसार, जुलै 2024 मध्ये BSNL मध्ये 1.5 दशलक्ष नवीन ग्राहक जोडले गेले आहेत. तर ऑगस्ट 2024 मध्ये ही संख्या वाढून 2.1 दशलक्ष झाली.सप्टेंबर 2024 मध्ये 1.1 दशलक्ष ग्राहक BSNL शी जोडले गेले . ऑक्टोबर 2024 मध्ये 0.7 दशलक्ष ग्राहक BSNL सोबत जोडले गेले आहेत. आकडेवारीवर नजर टाकली असता BSNL युजर्सची संख्या झपाट्याने वाढली आहे. 

टॅरीफ प्लान महाग केल्याचा जबरदस्त फटका Jio, Airtel आणि Vi या खाजगी कंपन्यांना बसला आहे. Jio, Airtel, Vi यांच्या तुलनेत BSNL चे टॅरिफ प्लान हे स्वस्त आहेत. यामुळे ग्राहक  BSNL चा नंबर घेत आहेत. भरातीय टेलीकॉम कंपनी BSNL पुन्हा एकदा भरारी घेत आहे. कंपनीचा भविष्यात दर वाढवण्याचा कोणताही विचार नसल्याचे बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रॉबर्ट रवी यांनी सांगितले. भविष्यात BSNL कंपनी मोठी झेप घेईल असे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले.