मुंबई : आजकाल जवळपास प्रत्येकाच्या हातात आपल्याला स्मार्टफोन आढळतो. स्मार्टफोनमध्ये इतके फिचर्स आलेत की त्यामुळे लोकांचं खूप सारं काम अगदी कमी वेळेत पूर्ण होऊ शकतं. एका छोट्या मोबाईलमध्ये छोट्यात छोट्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. त्यामुळे घरबसल्या तुम्ही तुमचे अनेक कामं पूर्ण करू शकत असाल. असं असलं तरी मोबाईलचा हा अतिरेकी वापर तुमच्या मानसिक आरोग्यासाठी मात्र धोकादायक ठरतोय.
याच मोबाईलचा वापर एखाद्या व्यक्तीला तणावाकडे ढकलू शकतो. इतकंच नाही तर मोबाईलच्या अतिवापरामुळे तुमच्या आजूबाजूचं वातावरणही तुम्हाला भीतीदायक वाटू शकतं. तुम्हीच पाहा ना, तुमच्या मोबाईलवर सोशल मीडिया अकाऊंटवर एखादा मॅसेज किंवा नोटिफिकेशन आलं नाही किंवा फोनची बॅटरी संपली तर तुमच्या आजूबाजूचं सगळं जग काही काळ थांबलंय की काय? अशी शंका यावी, इतकी मोबाईलची सवय लोकांना झालीय.
त्यामुळे जेव्हापर्यंत तुमचा फोन चार्ज होत नाही, तेव्हापर्यंत तुम्ही त्याचबद्दल विचार करत राहता. अनेकदा फोनच्या तणावामुळे तुम्हाला एकाकी वाटू लागतं... आणि हळूहळू तुम्ही नैराश्याकडे झुकू लागता.
सॅन फ्रान्सिस्को स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका अभ्यासात शोधकर्ता एरिक पेपर आणि रिचर्ड हार्वे यांनी आपली मतं मांडलीत. स्मार्टफोनचा अधिक वापर त्याच्या दुरुपयोगासारखाच आहे. स्मार्टफोनचा अधिक वापर आपल्या मेंदूशी न्यूरॉलॉजिकल कनेक्शन बनवू लागतो. त्यामुळे त्याची गरज नसेल तरी ती भासत राहते. स्मार्टफोनच्या अधिक वापरामुळे आपला मेंदू त्याच्याशी कनेक्ट करू लागतो आणि समाजाशी हटकून वागू लागतो.
सॅन फ्रान्सिस्कोच्या 135 विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या या अभ्यासात पेपर आणि हार्वे यांच्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात आल्या. स्मार्टफोनचा अधिक वापर करणारे विद्यार्थी उगाचच आपल्या आजुबाजूच्या लोकांपासून वेगळं, एकाकी, तणावपूर्ण आणि चिंतीत आयुष्य जगतात.
डिजिटल अॅडिक्शन आपली चूक नाही... तर हा कॉर्पोरेट उद्योगाचा लाभ वाढवण्याच्या इच्छेचा परिणाम आहे. जिते अधिक क्लिक्स आणि लाईक तितका अधिक पैसा... या हव्यासापोटी लोकांच्या मानसिक स्वास्थ्य़ाशी खेळलं जातंय, असंही निरीक्षण पेपर आणि हार्वे यांनी नोंदवलंय.
शक्य असेल तर लोकांनी आपला फोन आणि कम्प्युटरचा ठराविक आणि योग्य वापर करावा, असा सल्लाही त्यांनी या निमित्तानं दिला आहे.